Nashik Tejas MK-1 Symbolic Flight : पूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या एका उपप्रकाराचे केवळ समारंभी उड्डाण नाशिक येथून १७ ऑक्टोबर रोजी झाले. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात बेंगळूरुपाठोपाठ आणखी एक जुळणी केंद्र सुरू झाल्याचा आनंद साजरा करण्यात गैर काहीच नाही. मात्र, ही विमाने हवाईदलात दाखल कधी होणार याचे उत्तर मात्र या उड्डाणातून मिळत नाही हेही वास्तव.

Tejas MK-1A चे उड्डाण केवळ प्रतीकात्मक?

तेजस एमके वन ए या प्रकारातील दोन लढाऊ विमाने ऑक्टोबरच्या अखेरीस हवाईदलात दाखल होणे अपेक्षित आहे. पण १७ ऑक्टोबरच्या तारखेची जोरदार चर्चा करणारे संरक्षण खाते या अत्यंत महत्त्वाच्या वितरणाची (डिलिव्हरी) चर्चा करण्यास तयार नाही. खरे तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अशा प्रकारे प्रत्यक्षात हवाईदलात दाखल होणाऱ्या विमानाची भरारी पाहायला केव्हाही आवडले असते. त्यांनी त्याऐवजी प्रतीकात्मक उड्डाणास उपस्थित राहण्यास पसंती दिली, याचा अर्थ त्यांना प्रत्यक्ष वितरणाविषयी खात्री नसावी, असा घेता येतो. भारतीय हवाईदलास पहिल्या टप्प्यात ८३ तेजस एमके वन ए विमाने एचएलकडून मिळणे अपेक्षित होते.

फेब्रुवारी २०२४पासून ही विमाने मिळणार होती. त्या आघाडीवर काहीच हालचाल दिसली नाही म्हणून हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मध्यंतरी संतप्त झाले होते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी एका हवाई प्रदर्शनात संताप आणि नैराश्याला वाट मोकळी करून दिली होती. तेजस एमके वन ए विमानाच्या प्रारूपातून उड्डाण करून आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले, की तुम्ही जे आता पाहिलेत ते एमके वन ए विमान नव्हते. अजून त्या विमानात सॉफ्टवेअर अंतर्भूत झालेले नाही किंवा शस्त्रास्त्रे चढवण्यात आलेली नाहीत. ते झाल्यानंतरच या विमानास तेजस एमके वन ए असे संबोधता येईल. 

दरम्यानच्या काळात पहलगाम हल्ला आणि पाठोपाठ ऑपरेशन सिंदूर घडले. तेजसच्या विलंबाची चर्चा त्यामुळे काहीशी मागे पडली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान हवाई दलाची कामगिरी निर्णायक ठरली. या कारवाईत प्रमुख उद्दिष्टे यशस्वीरीत्या साध्य झाली. राफेल या नव्याकोऱ्या लढाऊ विमानांची ही पहिलीच मोहीम होती. त्यामुळेही तेजसविषयी फार चर्चा झाली नाही. परंतु सप्टेंबर महिन्यात मिग-२१ विमानांची रीतसर निवृत्ती झाली आणि त्यातून निर्माण झालेल्या पोकळीच्या निमित्ताने तेजसचा विषय पुन्हा चर्चेत आला. या महिन्यात. हवाईदलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग ‘भुकेली तोंडे पहिल्या घासाची वाट पाहात आहेत’ असे सूचक विधान केले. 

Tejas MK-1A किती हवीत, किती आली?

हवाईदलात एचएएलकडून २०२९पर्यंत ८३ तेजस एमके वन ए विमाने दाखल होणे नियोजित आहे. गेल्या महिन्यात झालेल्या करारानुसार, आणखी ९७ विमाने २०२७ ते २०३४ या काळात हवाईदलाची ताकद वाढवतील असे अपेक्षित आहे. विद्यमान समस्येचे एक प्रमुख कारण म्हणजे, या विमानांचा आत्मा असलेल्या जीई एफ-४०४ इंजिन पुरवठ्यात अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) कंपनीकडून होत असलेला विलंब. पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे हा विलंब होत असल्याचे जीईचे म्हणणे आहे. आतार्यंत केवळ चारच इंजिने दाखल झाली आहेत. एकूण ९९ इंजिने भारताला मिळणार होती. दर महिन्याला दोन इंजिने पुरवण्याचा वायदाही जीईला पाळता आलेला नाही. पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा दाखला जीईकडून दिला जात असला, तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे सध्याचे स्वरूप पाहता, अत्युच्च पातळीवरून पुरवठ्याबाबत ‘जीई’वर दबाव येतच नसेल असे नाही. भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आपल्याला अशा प्रकारे कोणावर तरी अवलंबून राहावे लागते, ही बाब विलक्षण नामुष्कीजनक ठरते. 

जीईकडून होणारा इंजिन विलंब हा समस्येचा केवळ एक भाग आहे. कोणत्याही लढाऊ विमानाला ‘लढाऊ’ असे प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यावर अर्थातच बंदुका, क्षेपणास्त्रे, बॉम्ब अशी शस्त्रे चढवावी लागतात. रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक जॅमिंगविरोधी यंत्रणा ही महत्त्वाची उपकरणे बसवावी लागतात. त्यांच्या चाचण्या घ्याव्या लागतात. हवाईदलातील अनेक माजी आणि आजी अधिकाऱ्यांच्या मते, या चाचण्यांना होणारा विलंब अधिक धोकादायक ठरतो. तेजस एमके वन ए हे साडेचौथ्या पिढीच्या श्रेणीतील (फोर पॉइंट फिफ्थ जनरेशन) जगातले सर्वांत चिमुकले विमान ठरते. तरीदेखील शस्त्रास्त्रांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांच्या चाचण्या अधिक काटेकोरपणे घ्याव्या लागतात. ही विमाने मिग-२१ या विमानांची जागा घेणार आहेत. मिग विमाने लवचीकता आणि चपळाईसाठी जाणली जायची. ती ज्या काळात बनली, त्या काळापेक्षा विद्यमान युगात हवाई लढायांचे स्वरूप बदलले आहे. दर तीन ते पाच वर्षांनी नवी तंत्रज्ञान आणले आणि आत्मसात केले जात आहे. या शर्यतीत अधिग्रहणालाच चार-चार वर्षे विलंब होत असेल, तर तेजस विमानांचा दरारा राहणार कसा, हा प्रश्न आहे. 

स्काड्रन्सची भीषण कमतरता

लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वाड्रन्स किंवा तुकड्या या भारतासाठी, चीन व पाकिस्तान या दोन शत्रूंशी लढण्यास पर्याप्त आहेत याविषयी अनेकदा लिहून आले. मिग-२१ विमानांच्या निवृत्तीनंतर हवाईदलाच्या स्क्वाड्रन्सची संख्या २७ इतकी झाली असून, गेल्या सहा दशकांतील ती नीचांकी ठरते. ही पोकळी कशी भरायची याविषयी अत्युच्च पातळीवर गोंधळाची स्थिती आहे. राफेलच्या अधिग्रहणातून ते साधण्यासारखे नाही. सुमारे ११४ राफेल विमाने दाखल होण्याची प्रक्रियाही रखडलेली आहे. दरनम्यानच्या काळात, भारताच्या पहिल्यावहिल्या पाचव्या पिढीतील (फिफ्थ जनरेशन) लढाऊ विमानाच्या निर्मितीची महत्त्वाकांक्षा आपण बाळगून आहोत. त्यासाठी सरकारने १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तेजस एमके टू नामक हे विमान पुढील दशकाच्या सुरुवातीपर्यंत तरी हवाईदलात दाखल होण्याची शक्यता नाही.

हा सगळा विलंब अंगाशी येऊ नये, म्हणून ‘पोकळी भरून काढण्यासाठी’ अमेरिकेचे एफ-३५ आणि रशियाचे एसयू-५७ या विमानांची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नैहमीच्या शैलीत एफ-३५ विमानांची मागणीच भारताने नोंदवल्याचे मध्यंतरी जाहीर करून टाकले होते. मात्र हवाईदलातील बहुतेक प्रमुख अधिकाऱ्यांना अशा प्रकारे तात्पुरती मलमपट्टी मंजूर नाही. देशांतर्गत विमाने वेळेत मिळत नाहीत आणि परदेशी विमानांबाबत निर्णय होत नाही अशा विचित्र कात्रीमध्ये हवाईदल आणि सरकार अडकले आहे. 

siddharth.khandekar@expressindia.com