पीटीआय, वॉशिंग्टन
कॅनडातील हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवादी नेत्याच्या हत्येच्या तपासामध्ये कॅनडाला सहकार्य करावे अशी विनंती भारताला अनेक वेळा केली असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. निज्जरच्या हत्येच्या मुद्दय़ावरून भारत आणि कॅनडादरम्यानचे राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गेल्या आठवडय़ात अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याबद्दल प्रश्न विचारला असता, या प्रकरणी आम्ही कॅनडातील सहकाऱ्यांशी समन्वय राखून आहोत असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारताने कॅनडाच्या तपासात सहकार्य करावे अशी विनंती आम्ही भारत सरकारकडे अनेक वेळा केली असल्याचे मिलर म्हणाले. शुक्रवारी जयशंकर आणि ब्लिंकन भेटीदरम्यानही ही विनंती करण्यात आली असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात दोन्ही देशांनी आपापली भूमिका अमेरिकेकडे स्पष्ट केली आहे. निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात असल्याची शक्यता आहे हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा आरोप निराधार आणि हेतूने प्रेरित असल्याचे सांगून भारताने फेटाळला आहे.