Turkey Third Earthquake : टर्की देशात झालेल्या भूकंपामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भूकंपात जवळपास १२०० लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. टर्कीमध्ये २ भूकंपाचे हादरे बसलेले असताना आता येथे २४ तासांत भूकंपाचा तिसरा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल आहे. याआधी ७.६ आणि ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते.

भूकंपांमध्ये मोठी जीवित तसेच वित्तहानी

मिळालेल्या माहितीनुसार टर्कीमध्ये मागील २४ तासांमध्ये भूकंपाचा तिसरा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल आहे. मागील दोन भूकंपाच्या हादरल्यांमुळे शेकडो नारिकांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाच येथे भूकंपाचा हा तिसरा धक्का बसल्यामुळे येथे आणखी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यं १५०० जणांचा मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य

टर्कीसह सिरियामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमध्ये आतापर्यंत १५०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भूकंपांच्या घटनांमुळे अनेक मोठ्या इमारती क्षणात ध्वस्त झाल्या आहेत. या ढासळलेल्या इमारतींमध्ये शेकडो लोक दबल्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे.

पहाटे चार वाजता भूकंपाचा पहिला धक्का

तत्पूर्वी सोमवारी पहाटे चार वाजता टर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल

टर्की पहिल्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरत असताना काही तासांनंतर येथे लगेच दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल होती. या भूकंपामध्येही अनेक इमारती ढासळल्याचे म्हटले जात आहे. उपलब्ध व्हिडीओज आणि फोटोंनुसार टर्कीमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. टर्कीमधील कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत सरकारकडून मदत

दरम्यान, भूकंपामुळे टर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. अशातच भारतही टर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने NDRF च्या दोन टीम टर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शोहमोहीम आणि बचावकार्यासाठी भारत रिलीफ मटेरियलदेखील पाठवणार आहे.