पोलीस बंदोबस्तात कर्नाटकात टीपू जयंती

हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध

म्हैसूरचा १८व्या शतकातील राज्यकर्ता टीपू सुलतानच्या जयंतीला भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केल्याने कर्नाटक सरकारला ५४ हजार पोलिसांच्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये शुक्रवारी जयंती साजरी करावी लागली.

टीपू सुलतान हिंदूंवर अत्याचार करत होता, असा दावा हिंदुत्ववादी संघटना नेहमी करतात. यामुळे टीपू सुलतानची जयंती साजरी करण्यास त्यांचा नेहमी विरोध असतो. अनेकदा छोटय़ा-मोठय़ा दंगलीही घडल्या आहेत. यंदा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीही कर्नाटक सरकारला टीपू सुलतान जयंतीला आपल्याला न बोलावण्याची विनंती केली होती. तर इतिहासकार सी. पी. बेलीअप्पा यांनी टीपू सुलतानला ‘विश्वासघातकी राज्यकर्ता’ असे संबोधले आहे.

टीपू सुलतान जयंतीला भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. यामुळे कर्नाटक सरकारला शुक्रवारी राज्यभरात जवळपास ५४ हजार पोलीस फौजफाटा तैनात करावा लागला. यापैकी ११ हजार पोलीस एकटय़ा बेंगळूरुमध्ये तैनात करण्यात आले होते. तर २० हजार गृहरक्षक दलाचे जवान आणि शीघ्र कृती दलाच्या १५ तुकडय़ा तैनात होत्या. तसेच बेळगाव आणि चित्रदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तर मंगळूरुमध्ये भाजपचा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष फ्रँकलीन माँटेरिओ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना काही कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले. राज्यभरातील कार्यक्रमांकडे भाजपच्या खासदार, आमदारांनी पाठ फिरविली होती.

कोण होता टीपू सुलतान?

म्हैसूरचा वाघ म्हणून टीपू सुलतान ओळखला जातो. इंग्रजांना त्याने आपल्या कौशल्याने सळो की पळो करून सोडले होते. अखेर श्रीरंगपटना किल्ल्याचे रक्षण करतेवेळी इंग्रजांनी त्याला मे १७९९ मध्ये मारले होते. कोडगू जिल्ह्य़ामध्ये (तत्कालीन कोडवास) हजारो हिंदू महिला आणि पुरुषांवर त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अनन्वित अत्याचार करत ठार केले होते, असा दावा  केला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tipu sultan jayanti in karnataka