पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथे झालेल्या हिंसाचारातील प्रमुख आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहान शेख (५३) याला अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मीनाखान परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्याला आज बशीरहाट न्यायालयात हजर केले जाईल. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मीनाखान परिसरातील घरात शाहजहान शेख लपून बसला होता.

विश्लेषण : संदेशखाली प्रकरण काय आहे? यावरून ममता-भाजप संघर्ष का उडाला?

शाहजहान शेख आणि त्यांच्या साथीदारांवर जमीन बळकावणे आणि महिलांवर अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. शेखने केलेले अत्याचार बाहेर आल्यानंतर त्यांच्याविरोधात संदेशखली भागात आंदोलन सुरू झाले. ५ जानेवारी रोजी रेशन घोटाळ्यात ईडीचे अधिकारी शाहजहान शेखची चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. तेव्हापासून शाहजहान शेख फरार होता.

कलकत्ता उच्च न्यायालयाने शाहजहान प्रकरणी राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर शाहजहान शेखची अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शेख सापडत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी (२६ फेब्रुवारी) उच्च न्यायालयाने शेख याच्या अटकेस स्थगिती देण्याची मागणी धुडकावून लावली. तसेच ५० हून अधिक दिवस होऊनही शेख याला अटक का होत नाही? असा संतप्त सवालही न्यायालयाने विचारला.

“धर्म आणि वय पाहून महिलांवर अत्याचार केले जातात, जगात असं…”, संदेशखाली प्रकरणी स्मृती इराणींचा संताप

फेब्रुवारी महिन्यात संदेशखलीमध्ये शाहजहान शेख प्रकरणावरून वातावरण चांगलगेच तापले. शेख याचे साथीदार उत्तम सरदार आणि शिवप्रसाद हाजरा यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. या आरोपांनंतर भाजपाच्या वतीने तृमणूल काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

ताजी अपडेट

शाहजहान शेखला गुरुवारी पहाटे अटक केल्यानंतर बशीरहाटच्या न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत शाहजहान शेखच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी पश्चिम बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविली जाईल.