राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट

नवी दिल्ली : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी तपास अधिकारी व अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मात्र दिल्लीवाऱ्या कराव्या लागत आहेत. जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाल्यामुळे वानखेडे यांनी सोमवारी दिल्लीत येऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली व जात प्रमाणपत्राची मूळ कागदपत्रे सादर केली.

वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर नसून दाऊद असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यातच या प्रकरणात २५ कोटींच्या लाचखोरीचा आरोप साक्षीदार व पंच प्रभाकर साईल याने केल्यामुळे वानखेडे यांना सातत्याने स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आठवड्याभराच्या कालावधीत वानखेडे यांना दुसऱ्यांदा दिल्लीला यावे लागले असून ‘एनसीबी’च्या महासंचालकांना भेटण्यासाठी ते राजधानीत आले होते. त्यानंतर ‘एनसीबी’च्या उपमहासंचालकांच्या चमूने मुंबईत त्यांची चौकशी केली होती.

वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महसूल खात्यात नोकरी मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गातील उमेदवाराचे वानखेडे यांनी नुकसान केले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केले असून कथित निकाहनामा सादर करत वानखेडे यांनी मुस्लीम पद्धतीने लग्न केल्याचा दावा केला आहे. मात्र, आपले वडील हिंदू-दलित असल्याने आपण हिंदू धर्मीय असल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे. आता वानखेडे यांच्या जातीसंदर्भात शहानिशा केली जाणार आहे. त्यासंदर्भात अनुसूचित जातीच्या दाखल्याची कागदपत्रे वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला दिली.

‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांनी माझी भेट घेतली असून त्यांनी धर्म, जात आणि लग्नासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांच्या सत्यतेची राज्य सरकारकडून पडताळणी केली जाईल. त्यासाठी ही कागदपत्रे राज्याला पाठवली जाणार असून त्यावर सात दिवसांत उत्तर पाठवण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. कागदपत्रे बनावट नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, असे सांपला यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याशी मुंबईत वानखेडेंनी चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी हलदर यांनी वानखेडे यांच्या वडिलांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती व काही कागदपत्रांची शहानिशा केली होती. त्यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना र्पांठबा दर्शविला. वानखेडे चांगले काम करत असून त्यांच्या विभागासाठी ही अभिमानाची बाब आहे; पण मंत्र्यांनी त्यांच्याविरोधात वैयक्तिक द्वेषारोप केले आहेत. वानखेडे बनावट कागदपत्रे आयोगाला देऊ शकत नाहीत, अन्यथा त्यांची सरकारी नोकरीतून हकालपट्टी केली जाऊ शकते, असे हलदर म्हणाले. हलदर यांच्या भेटीगाठींवर आक्षेप घेत, राष्ट्रपतींकडे तक्रार केली जाईल. हलदर यांना तातडीने वानखेडे यांची भेट घेण्याची गरज काय होती, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.