“त्यांचं ऑफिस जमिनीखाली आहे”; ED ने सुप्रीम कोर्टात दिली चक्रावून टाकणारी माहिती

संजय आणि अजय चंद्रा दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत.

संग्रहित छायाचित्र

युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्रा अंडरग्राऊंड ऑफिसचा वापर करत होते आणि पॅरोल किंवा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे पुत्र संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांनी त्या ऑफिसला भेट दिली होती, अशी माहिती ईडीने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ईडीकडून चंद्रा आणि युनिटेक लिमिटेडच्या विरोधात मनी लाँडरिंगच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तसेच संजय आणि अजय चंद्रा दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, तरीही ते तुरुंगाच्या आत राहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत तसेच मालमत्ता विकत आहेत, असंही ईडीने म्हटलंय.

चंद्रांनी त्यांच्याबद्दलची माहिती बाहेरच्या जगाला देण्यासाठी कारागृहाबाहेर अधिकारी नेमले आहेत, असे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाला अंमलबजावणी संचालनालयाकडे हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी सांगितले.

“आमच्या एका शोध आणि जप्ती ऑपरेशन दरम्यान, आम्ही एक गुप्त भूमिगत कार्यालय शोधून काढले आहे, ज्याचा वापर रमेश चंद्रा करत आहेत आणि त्यांचे मुल पॅरोल किंवा जामिनावर असताना त्या ऑफिसला भेट देतात. आम्ही त्या कार्यालयातून शेकडो मूळ विक्री कागदपत्रे, शेकडो डिजिटल स्वाक्षऱ्या आणि देश आणि विदेशातील मालमत्तेसंदर्भात संवेदनशील डेटा असलेले अनेक कम्प्युटर जप्त केले आहेत.” असे माधवी दिवाण यांनी खंडपीठाला सांगितले. तसेच ईडीने सीलबंद कव्हरमध्ये दोन अहवाल कोर्टात सादर केले असून त्यासोबत युनिटेक लिमिटेडच्या देश-विदेशातील ६०० कोटींच्या मालमत्तेसंदर्भातील माहिती जोडली आहे.

माधवी दिवाण यांनी सांगितले की “ईडीला शेल कंपन्यांच्या माध्यमातून तयार केलेली मनी ट्रेलची एक साखळी सापडली आहे. त्याच्या माध्यमातून त्यांची संपत्ती ते रिअल टाईममध्ये विकत आहेत, त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. तसेच चंद्रा जेलमध्ये राहून त्यांचं काम करत आहेत. न्यायालयीन कोठडीत असूनही ते बाहेरच्या लोकांशी संवाद साधत आहेत आणि कारागृहाच्या बाहेर नियुक्त केलेल्या लोकांच्या मदतीने सूचना देत आहेत.”

दरम्यान चंद्रांचे वकील विकास सिंह यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तर,सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की चंद्रा कोर्टात हजर नसल्याने सुनावणी होणार नाही. तर ईडीच्या निवदेनांवर सुनावणी घेतली जाईल. पूर्वी ४ जून रोजी सुप्रीम कोर्टाने संजय चंद्राला त्याच्या सासऱ्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१७ पासून तुरुंगात असलेल्या चंद्राचा भाऊ अजय चंद्राचा जामीन अर्जही फेटाळला होता. संजय आणि अजय या दोघांवर घर खरेदीदारांचे पैसे लुबाडल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ च्या आदेशात त्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये ७५० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. तर, न्यायालयाच्या अटींचे पालन करून ७५० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने नियमित जामीन दिला जातो, असा दावा चंद्रांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unitech founder ramesh chandra using secret underground office sanjay chandra and ajay chandra visited hrc

ताज्या बातम्या