उन्नाव येथे २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेला भाजपचा हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेनगर याचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. गेल्या रविवारी रायबरेली येथे झालेल्या अपघातात बलात्कारातील पीडित मुलगी व तिचे वकील गंभीर जखमी झाले असून तिची काकू व मावशी हे ठार झाले होते.
सेनगर याच्याकडे एका नळीची बंदूक, रायफल व रिव्हॉल्व्हर अशा शस्त्रांचा परवाना होता.

बांगरमाऊचा आमदार असलेल्या सेनगर याला १३ एप्रिल २०१८ रोजी सीबीआयने बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याला सध्या सीतापूर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.त्याचे शस्त्रपरवाने रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून शुक्रवारी उन्नावच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याचे शस्त्रपरवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सेनगर याचे शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी केली होती.

सेनगर याच्यावर २०१७ मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्या वेळी ती अल्पवयीन होती, आता ती १९ वर्षांची आहे. गेल्या रविवारी पीडित मुलगी तिच्या काकांना भेटण्यासाठी तिचा वकील, मावशी व काकू यांच्या समवेत जात असताना त्यांच्या मोटारीला रायबरेली परिसरात ट्रकने धडक दिली. त्यात पीडितेच्या काकू व मावशी ठार झाल्या.