उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण सुप्रीम कोर्टात; सीबीआय चौकशीची मागणी, भाजपा आमदारावर आहे बलात्काराचा आरोप

पीडितेने योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता

भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप असलेलं उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून सखोल चौकशी केली जावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पीडितेला भरपाई दिली जावी तसंच तिला आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या प्रकरणात पीडितेच्या वडिलांचा काल तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर आजच उत्तर प्रदेश पोलिसांनी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या भावाला अटक केली. लखनऊ क्राइम ब्रांचने कुलदीप सिंह सेंगरचा भाऊ अतुल सिंह याच्यासह चार आरोपींना अटक केली आहे. विरोधकांकडून खरपूस टीका झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या पीडित महिलेच्या वडिलांचा काल तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे वडिलांचा मृत्यू होण्याच्या एक दिवसापूर्वीच म्हणजे रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी आणि 4 पोलीस हवालदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनीच पीडितेच्या वडिलांची हत्या घडवून आणली असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करुन सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर या महिलेच्या पित्याला पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप केला होता. यापूर्वी आमदारांविरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून 3 एप्रिल रोजीही आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली होती.

महत्वाचे मुद्दे –
– पीडित महिलेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.
– पीडित महिलेने उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप केला होता.
– मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत विनंती केली होती तरीही काही कारवाई झाली नाही. मी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला तेव्हाही मला धमकावण्यात आलं होतं.
-एका वर्षापासून न्यायासाठी पायपीट करत आहे, पण कोणीच दखल घेत नाही. अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.
-जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर मी स्वतःचं आयुष्य संपवेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unnao rape case in supreme court bjp mla kuldeep senger

ताज्या बातम्या