उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर येथील रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एक भंगार विक्रेता जखमी झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. पोलिसांनी त्वरीत शोध कार्य सुरू केल्यामुळे आणखी तीन कमी तीव्रतेचे बॉम्ब सापडले. हे तिन्ही बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर लावण्यात आले होते. रेल्वे ट्रॅक उडवून रेल्वे अपघात करण्याची योजना असल्याचे यावरून दिसून आले. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही योजना अयशस्वी ठरली. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि बॉम्बशोध पथक पोहोचले आहे. या परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

या महिन्याच्या सुरूवातीलाच ७ मार्च रोजी भोपाळ-उज्जैन रेल्वेत स्फोट झाला होता. ही रेल्वे भोपाळवरून उज्जैनला जात होती. हा स्फोट सकाळी ९.३० च्या सुमारास जनरल बोगीत झाला होता. यापूर्वी गतवर्षी कानपूर येथेही रेल्वे अपघात झाला होता. कानपूर येथील अपघातात इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे रेल्वे ट्रॅकवरून घसरले होते. यामध्ये १२० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातामुळे गृहमंत्रालयाने एका विशेष समिती नियुक्त केली होती. रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेससाठी उपाययोजना करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. गृहमत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला होता.