बँकॉक : म्यानमारच्या लष्करी राजवटीने मे महिन्यापासून ताब्यात घेतलेले अमेरिकन पत्रकार डॅनी फेनस्टर यांना दहशतवाद आणि देशद्रोहासह विविध आरोपांसाठी ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. डॅनी फेनस्टर हे ‘फ्रंटियर म्यानमार’ या ऑनलाइन नियतकालिकाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्यावर बेकायदा संघटनांशी संपर्क तसेच व्हिसा संबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीही दोषी आढळले आहेत असे त्यांचे वकील थान जाओ आंग यांनी सांगितले. त्यांना प्रत्येक आरोपासाठी जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

‘फ्रंटियरमधील प्रत्येकजण या निर्णयामुळे निराश आणि हताश झाला आहे. आम्हाला फक्त डॅनीला शक्य तितक्या लवकर सोडण्यात आलेले पहायचे आहे जेणेकरून तो त्याच्या घरी कुटुंबाकडे घरी जाऊ  शकेल’, असे मुख्य संपादक थॉमस कीन यांनी   एका निवेदनात म्हटले आहे.

फेनस्टर यांना २४ मे रोजी यंगून आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अमेरिकेतील डेट्रॉईट भागात जाण्यासाठी निघाले होते. आँग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारला हटवून फेब्रुवारीमध्ये लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून गंभीर गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले ते एकमेव परदेशी पत्रकार आहेत.

लष्कराने स्थापित केलेल्या सरकारने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर टांच आणली आहे, अनेक प्रसारमाध्यमे बंद केली आहेत आणि १०० पत्रकारांना अटक केली आहे, त्यापैकी ३० तुरुंगात आहेत. काही बंद प्रसारमाध्यमे परवानगीशिवाय कार्यरत आहेत, त्यांचे कर्मचारी सदस्य अटक टाळण्यासाठी ते ऑनलाइन प्रकाशित करतात.