करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरू होत असून, त्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. या लाभार्थींनी लसीकरणासाठी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहनही केंद्राने केले.

देशात १६ जानेवारीला करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात करोनायोद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. आता सहव्याधी नसलेल्याही ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

गेल्या आठवड्यात, १७ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी देण्याची विनंती केली होती. महाराष्ट्रच नव्हे तर, अन्य राज्यांमध्येही करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाचा वेग वाढण्याचीही सूचना राज्य सरकारांना केली आहे. लसीकरणाच्या परिघात अधिकाधिक लोकांचा समावेश करावा या दृष्टीने केंद्र सरकारने ४५ व त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

लशींच्या दोन मात्रा ४ ते ८ आठवड्यांच्या कालांतराने घेण्याची सूचना या संदर्भातील उच्चस्तरीय तज्ज्ञ गटाने केली आहे. यापूर्वी ४ ते ६ आठवड्यांनी दुसरी मात्रा दिली जात होती. ८ आठवड्यांच्या अंतराने घेतलेली दुसरी मात्रा अधिक परिणामकारक ठरेल, असे शास्त्रज्ञांचे मत असल्याने दोन मात्रांमधील अंतर वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली.

देशात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणात कोणतीही अडचण येणार नाही. या निर्णयाचे स्वागत करून नागरिकांनी लसीकरण करून घेतले तर या मोहिमेचा वेग वाढू शकेल. आतापर्यंत एकूण ४.८ कोटी जणांचे लसीकरण झाल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

राज्यात करोनाचे २८,६९९ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या २८,६९९ नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात १३२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, पुणे शहरात रुग्णवाढीचा कल कायम आहे. विदर्भानंतर मराठवाड्यात करोना रुग्ण वाढू लागले आहेत. दिवसभरात मुंबई ३५१२, पुणे शहर ३१४५, पिंपरी-चिंचवड १४८८, उर्वरित पुणे जिल्हा ११०८, नाशिक शहर ९४७, औरंगाबाद शहर ११२५, नांदेड शहर ११७१, अकोला ३७२, जळगाव जिल्हा ११०० रुग्ण आढळले. राज्यात सध्या २ लाख ३० हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह््यातील सर्वाधिक ४३,९५० जणांचा समावेश आहे.

पंजाबमधील ४०१ पैकी ८१ टक्के नमुन्यांमध्ये ब्रिटनचा नवकरोना

चंडीगड : पंजाबमध्ये ब्रिटनच्या नवकरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याचे आढळले आहे. राज्यातून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवलेल्या ४०१ करोना रुग्णांच्या नमुन्यांपैकी तब्बल ८१ टक्के नमुन्यांत ब्रिटनचा नवकरोना आढळला असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची मागणी अमरिंदर सिंग यांनी केंद्राकडे केली आहे.

मुंबईत होळी-धुळवडीला मनाई

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढू लागल्याने मुंबईमध्ये सार्वजनिकरीत्या होळी आणि धुळवड साजरी करण्यास मुंबई महापालिके ने बंदी घातली आहे. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढले आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत वैयक्तिकरीत्याही हे उत्सव साजरे करणे टाळावे, असे आवाहन आयुक्तांनी के ले आहे.

कठोर निर्बंधांबाबत आज निर्णयाची शक्यता

मुंबई : सरकारने वारंवार नियमपालनाचे आवाहन करूनही नागरिकांकडून त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे सध्या लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे प्रवासाच्या ठरवून दिलेल्या वेळांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच काही शहरांमध्ये अंशत: टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज, बुधवारच्या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.