जोधपूर : भारतासाठी प्रतिष्ठेची आणि गौरवाची ठरणारी ‘वंदे भारत’ शयनयान रेल्वे पुढील वर्षी जूनमध्ये धावणार आहे. या खास अतिवेगवान रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी (सर्व्हिसिंग अँड मेंटेनन्स) भारतातील पहिले मोठे केंद्र जोधपूरमध्ये लवकरच कार्यरत होत आहे. एक अत्याधुनिक भारतीय रेल्वे बनवण्यापासून ते आता तिच्या संपूर्ण देखभाल, दुरुस्तीसाठी एक अवाढव्य कार्यशाळा उभारण्यातील हा मोठा टप्पा भारतीयांसाठी अभिमानाचा ठरणार आहे.

‘वंदे भारत’ शयनयान रेल्वे निर्मितीचा उद्याोग महाराष्ट्रातील लातूर येथे उभारण्यात आला आहे. या उद्याोगातून पहिली रेल्वे जून २०२६ मध्ये धावणार आहे. सुरुवातीच्या चाचण्या पार पडल्यावर लगेच या रेल्वे गाड्यांची निर्मिती सुरू केली जाणार आहे. भारतासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या वंदे भारतसाठी आवश्यक म्हणून त्याच बरोबरीने हा देखभाल दुरुस्तीचा प्रकल्पही जोधपूरमध्ये कार्यान्वित होत असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता मेजर अमित स्वामी यांनी दिली.

साधारण एक रेल्वे गाडीने तीन दिवसांचा प्रवास किंवाचार हजार किलोमीटरचे अंतर कापले तर त्या गाडीची दुरुस्ती करण्याचा निकष आहे. यानुसार भविष्यात देशभर धावणाऱ्या शेकडो ‘वंदे भारत’च्या दुरुस्तीचे नियोजन येथे केले जाणार आहे. या मध्ये सिम्युलेटर, रोबोट यांचाही वापर केला जाणार आहे. याशिवाय ह्य वंदे भारतह्ण सोबतच अतिजलद रेल्वेगाड्यांसाठी आता जोधपूर येथील या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. वंदे भारतसाठी भविष्यात ब्रिजवासन (दिल्ली), थानीसॅद्रा (बंगळूरु), आनंदविहार (दिल्ली), वाडीबंदर (मुंबई) या चार ठिकाणीही कार्यशाळा सुरू करण्यात येणार आहेत.

पुण्याचा सहभाग

जोधपूर रेल्वे दुरुस्ती प्रकल्पाच्या उभारणीचे काम पुण्याच्या एचवायटी इंजिनिअरिंग कंपनीला मिळाले आहे. भारतीय रेल्वेच्या तांत्रिक विभागाने तयार केलेल्या योजनेला या कंपनीकडून मूर्त रूप दिले जात आहे.

साडेतीनशे कोटींचा खर्च

● जोधपूर येथे देशातील सर्वात मोठी आणि आधुनिक अशी रेल्वे दुरुस्तीची कार्यशाळा असणार आहे. या साठी तब्बल ६०० फूट लांबीची आधुनिक कार्यशाळा उभारण्याचे काम सध्या जोधपूरमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे.

● येथे तीन रेल्वे मार्ग आखण्यात आले असून, एकावेळी तीन तर एका दिवसात ९ वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. रेल्वे गाड्या दुरुस्तीचे काम तीन पातळ्यांवर केले जाणार आहे. रेल्वे वर उचलण्याची यंत्रणा तयार करण्यात येत आहे. अशाप्रकारे संपूर्ण रेल्वे वर उचलून तिच्या दुरुस्तीचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असणार आहे.

● प्रकल्पासाठी एकूण साडेतीनशे कोटींचा खर्च येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १६७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्प उभारण्यात भारतीय रेल्वेसोबतच रशियातील कायनेट ही कंपनी देखील कार्यरत आहे.

वंदे भारत ही आकाराने लांब आणि अतीवेगवान प्रकारात मोडणारी रेल्वे आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभी करणे आवश्यक होते. अशी रेल्वे बनवण्यासोबतच तिच्या दुरुस्तीची यंत्रणा भारतीय रेल्वेने उभी केली ही गोष्ट गौरवास्पद आहे. – मेजर अमित स्वामी, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता, जोधपूर वंदे भारत कार्यशाळा.