अलिबाग :  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी प्रचारासाठी छापलेल्या पुस्तिकेवर मुद्रक, प्रकाशक आणि प्रती यांचा तपशील छापलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रायगडचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबागच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गिते यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.     लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनंत गिते यांच्याकडून वारंवार आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. सुनील तटकरे यांच्यावतीने अ‍ॅड. सचिन जोशी यांनी याबाबतची लेखी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. अनंत गिते यांनी निवडणूक प्रचारासाठी सिंहावलोकन नामक एक पुस्तिका काढली आहे. यात लोकसभा मतदारसंघात खासदार निधी व इतर माध्यमांमधून त्यांनी केलेल्या कामाचा तपशील आहे. ३६ पानी या पुस्तिकेवर मुद्रक आणि प्रकाशकांची नावे छापण्यात आलेली नाहीत. तसेच किती पुस्तिका छापल्या याची नोंदही करण्यात आलेली नाही, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पुस्तिकेची सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे अपेक्षित आहे. पुस्तिका छापण्यासाठी झालेल्या खर्चाची नोंद करणेही गरजेचे आहे. त्यामुळे अनंत गिते यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुनील तटकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. या तक्रारीची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी अलिबागच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत नियमोचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनंत गिते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.