Monkey Steals devotee’s purse with Rs 20 lakh jewellery in Vrindavan : वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भाविक व स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अलीगढवरून श्री बांके बिहारींच्या दर्शनासाठी आलेले भाविक अभिषेक अग्रवाल यांच्याकडील पर्स एका माकडाने पळवली आहे. माकडाने त्यांच्या हातातली पर्स हिसकावली आणि तिथून धुम ठोकली. धक्कादायक बाब म्हणजे अग्रवाल यांनी या पर्समध्ये जवळपास २० लाख रुपयांचे दागिने ठेवले होते.

अभिषेक अग्रवाल हे यांच्या कुटुंबियांसमवेत दर्शनाच्या रांगेत उभे होते. त्याच वेळी एक माकड तिथे आलं. त्या माकडाने अग्रवाल यांच्या हातातील पर्स पाहून त्यांच्या दिशेने धाव घेतली. माकडाने त्यांच्या अंगावर उडी मारून हातातील पर्स हिसकावली. पर्स अग्रवाल यांच्या हातून निसटताच माकडाने तिथून धुम ठोकली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने होते. चेन, बांगड्या, झुमक्यांसह हिऱ्यांचे दागिने या पर्समध्ये ठेवले होते. सर्व दागिन्यांसह पर्स घेऊन माकड तिथून बेपत्ता झालं आहे. माकड तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्या माकडाला फ्रुटी (पेय) व इतर खाद्यपदार्थांचं अमिष दाखवून आपल्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला मात्र, माकड काही आलं नाही. त्याने तिथून पळ काढला.

दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर पर्स मिळाली

माकडाने पर्स पळवल्यानंतर अग्रवाल कुटुंब घाबरलं. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मंदिरातील सुरक्षा कर्मचारी व पोलिसांनी तातडीने माकडाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन तास मंदिर परिसरात शोधमोहीम राबवल्यानंतर मंदिराच्या मागील झुडुपांमध्ये पर्स सापडली. पर्समधील सर्व दागिने सुरक्षित होते. तसेच कुठल्याही वस्तूचं नुकसान झालेलं नव्हतं. पोलिसांनी ही पर्स सर्व दागिन्यांसह अभिषेक अग्रवाल यांना सुपूर्द केली आहे. दागिने हातात आल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला.

वृंदावनमध्ये माकडांचा वाढता उपद्रव

दरम्यान, या घटनेनंतर मंदिर परिसरात माकडांपासून भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे. माकडांपासून भाविक व त्यांच्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाने उपाययोजना राबवल्या पाहिजेत असं मत भाविकांनी नोंदवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की अलीकडच्या काळात परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. माकडं भाविकांच्या हातातील पिशव्या, पर्स, मोबाईल, खाद्यपदार्थांची पाकिटे हिसकावून पळून जातात. लहान मुलांच्या हातातील अन्नपदार्थ हिसकावण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतात. दरम्यान, पोलिसांनी भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मौल्यवान वस्तू पिशवीत किंवा पर्समध्ये ठेवू नये असं सांगितलं आहे. तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.