काळजी घ्या, Delta Variant करोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO चा इशारा!

WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी करोनाच्या Delta Variant विषयी जगभरातल्या देशांना इशारा दिला असून व्यापक लसीकरणाचा सल्ला दिला आहे.

who chief tedros on delta variant transmissible
Delta Variants विषयी जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

करोनाच्या Delta Plus Variant ची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या प्रकाराची धास्ती घेतली असताना भारतातल्या १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधित २० रुग्ण आत्तापर्यंत आढळून आल्यामुळे चिंता वाढली असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

८५ देशांमध्ये Delta चे रुग्ण!

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभीर्य विषद केलं. “पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातल्या जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या करोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि करोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला थांबवायचं असल्यास जगातल्या सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा”, असं टेड्रॉस यावेळी म्हणाले.

 

Maharashtra Unlock : आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच! सरकारनं जारी केले नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल!

कमी संक्रमण, कमी व्हेरिएंट!

दरम्यान, यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी करोनाच्या नवनवीन व्हेरिएंटला आवर घालण्यासं सूत्र दिलं. जेवढं या विषाणूचं संक्रमण आपण कमी करू, तेवढे त्याचे व्हेरिएंट कमी असतील, असं ते म्हणाले. त्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली. हे लसीकरण जगातल्या सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. “तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाउन दिसेल”, असं टेड्रॉस यांनी सांगितलं.

भारतात १८ जिल्ह्यांमध्ये Delta Plus चे रुग्ण

भारतातील १८ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५० रुग्ण समोर आले आहेत. करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ सुजीत सिंह यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी देशातील ८ राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. या ठीकाणी ५० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Who chief dr tedros warns world about corona delta variants appeal vaccination pmw

ताज्या बातम्या