Donald Trump On Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मतभेद झाले आहेत. तेव्हापासून दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. मस्क हे ट्रम्प यांच्या धोरणावर टीका करत आहेत. यातच मस्क यांनी नवा पक्ष काढण्याचा इशारा दिला. मात्र, त्यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांना थेट हद्दपार करण्याची धमकी दिल्यामुळे दोघात चांगलंच जुंपल्याचं दिसत आहे.
ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी वन बिग, ब्युटीफुल बिलावर सीनेटमध्ये मतदान चालू आहे. यातच या विधेयकावर मस्क यांनी टीका केली. त्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापले. ‘एलॉन मस्क यांना दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावं लागेल’, असं विधान करत ट्रम्प यांनी मस्क यांना थेट इशारावजा धमकी दिली. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, एलॉन मस्क यांना खरंच हद्दपार करणार का? यावर ट्रम्प यांनी फक्त एका वाक्यात उत्तर दिलं.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मला माहित नाही. मात्र, आपल्याला यावर एक नजर टाकावी लागेल.”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, जर वन बिग, ब्युटीफुल बिल हे विधेयक मंजूर झालं तर मस्क यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदानाशिवाय बरंच काही गमावावं लागू शकतं, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
‘…तर मस्क यांना दक्षिण आफ्रिकेला परतावं लागेल’ : डोनाल्ड ट्रम्प
“मस्क यांना माहिती होतं की मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यक्तीवर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. मस्क यांना कदाचित मानवी इतिहासातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक अनुदान मिळू शकतं. मात्र, अनुदानाशिवाय त्यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावं लागेल. अनुदानाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट लॉन्चर उपग्रह व इलेक्ट्रिक कार्सचं उत्पादन होणार नाही. तसेच आपण खूप पैसे वाचवू शकतो”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
मस्क यांनी नवा पक्ष काढण्याचा दिला होता इशारा
मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला होता की One Big, Beautiful Bill सीनेटने पारित केल्यास त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. त्यावर ट्रम्प यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोल (मतदान) घेतलं होतं. याद्वारे त्यांनी अमेरिकन जनतेला नव्या राजकीय पक्षाबाबत त्यांचं मत विचारलं होतं. यावर हजारो नेटकऱ्यांनी मस्क यांच्या नव्या पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता.