तंबाखूचे व्यसन हा अजार नव्हे, ज्यासाठी औषधाची गरज आहे. हे व्यसन सोडण्यासाठी खंबीर निश्चय करायला हवा. एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी जवळजवळ ७० लाख व्यक्तींचा तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्यू होतो. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनी. ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे अशांनी ते सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस. या कार्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील असे काही उपाय आम्ही येथे सुचवत आहोत. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतात.
जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करावे – तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी पहिले तीन दिवस भरपूर पाणी प्यावे. सोबत ज्यूसचेदेखील सेवन करावे. यामुळे शरीरातील अधिक मात्रेतील निकोटिन शरीराबाहेर पडण्यास मदत होईल. ग्रीन टी फायदेशीर ठरू शकतो. काही दिवसांसाठी ब्लॅक टी आणि कॉफी टाळावी.
जेवणानंतरच्या सवयींमध्ये बदल करावा – जेवणानंतर तंबाखू चघळण्याची अथवा सिगारेट ओढण्याची सवय काहींना असते. यामुळे जेवण पचण्यास मदत होते असा त्यांचा भ्रम असतो. तंबाखू अथवा सिगारेटऐवजी एखादे फळ, चॉकलेट किंवा च्युइंगमचे सेवन करू शकता.
लक्ष अन्यत्र वळवा – सिगारेट ओढण्याची अथवा तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास तिला ताबडतोब दाबून टाका. अशावेळी तुमचे लक्ष अन्यत्र वळवा. टीव्ही पाहा, शॉवर घ्या, मित्राशी गप्पा मारा, एखादे छानसे पुस्तक वाचा अशा अनेक गेष्टी तुम्ही करू शकता. मन दुसऱ्या गोष्टीत रमविल्यामुळे विचारावर मात करता येऊ शकते.
स्वत:लाच बक्षिस द्या – व्यसनावर मात करण्यासाठी केलेल्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नासाठी स्वत:ला बक्षिस देऊन प्रोत्साहित करा. असे करत राहिल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल.
ब्रश करा – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा ब्रश करा. यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल. पुदीन्याची पाने चघळणेदेखील गुणकारी ठरू शकते.
खोल श्वास घ्या – रोज काही काळ एका जागेवर बसून खोल श्वास घ्यावा, ज्यामुळे तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची तीव्र इच्छा कमी होईल.
जिनसेंगचा वापर करा – डॉक्टरांच्या सल्ल्याने नाश्त्यामध्ये जिनसेंग पावडरचा वापर करावा. डोपामाइनची मात्रा कमी करण्यास फायदेशीर ठरते. निकोटिनमध्ये डोपामाइन सर्वाधिकप्रमाणात आढळून येते.
व्यसनमुक्तीचा संदेश असलेले रबरी ब्रेसलेट – जेव्हा तंबाखू खाण्याची अथवा सिगरेट ओढण्याची इच्छा होईल, तेव्हा हे ब्रेसलेट तुम्हाला व्यसनमुक्तीची आठवण करून देईल.
व्यायाम करावा – नियमित व्यायाम केल्याने आरोग्य तर चांगले राहते. मनात व्यसनाचा विचार डोकावल्यास जिथे असाल तिथे थोडीफार शारीरिक कवायत करून अथवा शक्य असल्यास १०- २० पुशअप्स मारून हलकासा व्यायाम करावा. यामुळे व्यसनाचे विचार दूर पळण्यास मदत होईल.
ध्यानधारणा – दिवसभरात १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा केल्यास तुम्ही इच्छांवर ताबा मिळवू शकता. याचा फायदा व्यसनमुक्तीसाठी होऊ शकतो.