टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण बुधवारी त्याच्या गावी आफरीनसोबत विवाहबद्ध झाला. वडोदरापासून ६० किलोमीटरवर असलेल्या नाडिआडमध्ये झालेल्या छोटेखानी घरगुती कार्यक्रमात या दोघांनीही ‘निकाह कबूल’ असल्याचे सांगितले. 
पठाण याचे आप्तेष्ट आणि मित्र विवाहसोहळ्याला उपस्थित होते. आफरीनचा जन्म मुंबईत झाला असून तिथेच तिने शिक्षण पूर्ण केले. सध्या ती वडोदरामध्ये फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करते. दोन्ही कुटुंबियांनी संमती दिल्यानंतरच युसूफचा आफरीनसोबत विवाह झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली.
गेले काही महिने टीम इंडियामधून बाहेर असलेल्या युसूफने आतापर्यंत ५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळून ८१० धावा केल्या आहेत. २२ ट्वेंटी-२० सामन्यांमध्येही त्याने २३६ धावा केल्यात.