हे पाचवं वर्ष. २००८ साली लेहमन ब्रदर्ससारखी बलाढय़ बँक बुडाल्यापासून गटांगळय़ा खाणारी जगाची अर्थव्यवस्था पाच र्वष झाली तरी स्थिरावताना दिसत नाही. या सरत्या वर्षांनं तर अस्थिरता अधिकच व्यापक केली. घसरता रुपया, त्याहूनही अधिक घसरती निर्यात आणि वाऱ्याच्या वेगानं वाढणारी महागाई यामुळे आपलं सगळय़ांचंच जगणं महाग झालं. या वर्षांअख्ेापर्यंत अर्थव्यवस्था स्थिरावेल असं म्हणताहेत तज्ज्ञ मंडळी. खरोखरच झालं तसं किंवा नाही झालं तरीही- मग धुमश्चक्री सुरू होईल राजकीय आघाडीवर! यंदाच्या दिवाळीतल्या भुईनळय़ांचा धूर हवेत विरायच्या आत पाच महत्त्वाच्या राज्यांतल्या निवडणुका मार्गी लागलेल्या असतील. पुढच्या दिवाळीला देशाला नवीन पंतप्रधान मिळालेला असेल; आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री!
हे सबंध वर्ष तसं आपल्यासाठी सर्व शक्याशक्यतांच्या सीमारेषा ताणण्यातच गेलं. कधी त्या आर्थिक होत्या, कधी प्रशासकीय, तर कधी राजकीय. या वर्षांत हवामानानंसुद्धा आपले हात-पाय पसरले. म्हणजे गेल्या वर्षांच्या तुलनेत तसा पाऊस यंदा आला वेळेवर; पण जायला तयार होईना. त्याचा मुक्काम इतका लांबला, की अश्विनी पौेर्णिमेचा चंद्रही शोधलं तरी सापडत नव्हता. आधीच मुळात आर्थिक कारणांमुळे वातावरणात उत्साह नाही. त्यातच ही वातावरणीय उदासी. सगळं कसं दमट दमट.
पण जातात. हेही दिवस जातात. ढग दूर होतात. स्वच्छ सोनपिवळं ऊन पडतं. आपलं आपल्यालाच छान वाटू लागतं.. आणि बघता बघता दिवस बदलतात. इतके, की आपल्यालाच खरं वाटत नाही. पण महत्त्वाचं असतं ते हेच की, या मधल्या प्रवासात न कंटाळता उजाडण्याची वाट पाहणं.. त्या उजाडण्यासाठी प्रयत्न करणं.. आणि नक्की उजाडणार आहे याची खात्री आपल्याच मनाशी बाळगणं.
हे उजाडणं आर्थिक असतं. सामाजिक असतं. आणि सांस्कृतिक तर असतंच असतं. यातही काहीजण असे असतात की स्वत:चं आकाश उजळून टाकताना इतरांच्या आकाशातला अंधारही दूर करतात. आपल्यालाही भेटलेले असतात असे काही.. आपल्या आकाशातला अंधार दूर करणारे.
पण आभार मानायचे नसतात त्यांचे.
आपण फक्त एवढंच करायचं..
इतरांच्या आकाशातला अंधार दूर करण्याच्या त्यांच्या कौशल्याचा, सामर्थ्यांचा अंश जमेल तेवढा आपल्यात उतरवून घ्यायचा.. साठवून ठेवायचा.
आणि इतरांच्या आयुष्यातल्या अंधारावर त्याचं शिंपण करायचं. प्रकाशाचा आनंद त्यांनाही द्यायचा.
हाच तर अर्थ आहे दीपोत्सवाचा..
शुभ दीपोत्सव..!
आपला..