Mahatma Gandhi Jayanti 2023 : २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून देशभरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. १८६९ मध्ये २ ऑक्टोबरला जन्मलेल्या गांधीजींनी आपले आयुष्य देशातील जनतेला ब्रिटिशांच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी समर्पित केले. गांधींजींनी जागतिक शांततेच्या मार्गाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने गांधीजींनी देशासाठी केलेल्या त्याग आणि कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या योजनांबाबतची माहिती जाणून घेऊ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २ फेब्रुवारी २००६ रोजी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामागे (MGNREGA) कामाच्या अधिकाराची हमी देण्याचा उद्देश आहे. हा एक भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे; जो २३ ऑगस्ट २००५ रोजी पारित करण्यात आला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या लोकांना रोजगार पुरविला जातो. त्यामध्ये १०० दिवसांपर्यंत रोजगाराची हमी केंद्र सरकार आणि त्यानंतरच्या रोजगाराची हमी राज्य सरकार देते. हेही वाचा- Gandhi Jayanti 2023 : मोहनदास गांधी ते राष्ट्रपिता…, कसा होता महात्मा गांधींचा जीवनप्रवास? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी…. स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी 'स्वच्छ भारत मिशन' योजनेला सुरुवात केली गेली. प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ करणेच नाही, तर जास्तीत झाडे लावून नागरिकांच्याजास्त सहभागाने स्वच्छ भारत निर्माण करणे, कचरामुक्त वातावरण निर्माण करणे, शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. बुनकर (विणकर) विमा योजना (Bunkar Bima Yojana) विणकर विमा योजना डिसेंबर २००३ मध्ये सुरू करण्यात आली. २००५ ते २००६ पासून या योजनेत 'महात्मा गांधी बुनकर' योजना या नावाने बदल आणि अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेचे मूळ उद्दिष्ट हातमाग विणकरांना नैसर्गिक, तसेच अपघाती मृत्यू आणि संपूर्ण किंवा आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत विमा संरक्षण देणे हे आहे. महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना (MGPSY) मे २०२३ मध्ये महात्मा गांधी सुरक्षा प्रवासी योजना (MGPSY) सुरू करण्यात आली. ही एक ऐच्छिक योजना आहे; जिचा उद्देश स्थलांतरीत कामगारांचे संरक्षण आणि कल्याण करणे, तसेच स्थलांतर तपासणी-आवश्यक (ECR) देशांमध्ये त्यांच्या सामाजिक सुरक्षा समस्यांचे निराकरण करणे हा आहे.