Gudi Padwa 2023: यंदाच्या वर्षी २२ मार्च रोजी गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेमध्ये एकूण बारा महिने आहेत. चैत्र हा त्यातील पहिला महिना आहे. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. अनेक कथा, आख्यायिकांमध्ये या सणाचा उल्लेख आढळतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी खूप शुभ मानली जाते. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या तिथीला सुरु केलेले काम पूर्णत्वास येते असे म्हटले जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हा सण मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढी पाडव्याच्या दिवशी लोक पहाटे लवकर उठतात. अंघोळ व अन्य कार्यक्रम आटपून घरामध्ये सजावट करतात. या निमित्ताने घराबाहेर रांगोळी काढली जाते. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. मुहूर्त पाहून योग्य पद्धतीने गुढी तयार केली जाते आणि त्यानंतर ती घराबाहेर किंवा घरातील उंच ठिकाणी उभारली जाते. त्यानंतर प्रसाद म्हणून कडुलिंब, गूळ, जिरे या पदार्थांपासून केलेले कडुनिंबाचे पाणी दिले जाते. काही ठिकाणी कडुलिंबाचा पाला खाण्यासाठी दिला जातो. यामागे नववर्षाच्या सुरुवातीला या पाल्याच्या रुपाने कडवटपणा निघून जावा असे कारण दिले जाते.

आणखी वाचा – Gudi Padwa 2023: गुढी कशी उभारावी? जाणून घ्या तयार केलेल्या गुढीच्या पूजनाची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त

गुढी पाडव्याला कडुलिंबाची पाने खाण्यामागे काही वैद्यकिय कारणे आहेत. चवीला कडू असलेली ही पाने शरीरासाठी फायदेशीर असतात. गुळासह कडुलिंबाचा पाळा चावल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर निघून जातात. ही वनस्पती खूप उपयुक्त असल्याचे जुन्या ग्रंथांमध्ये नमूद करण्यात आले आहे. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. गुढी पाडव्याच्या वेळी उन्हाळ्याला सुरुवात होते. या काळामध्ये वाढत्या उष्णतेचा शरीरावर प्रभाव होत असतो. यात त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकण्याचा सल्ला दिला जातो. ही पाने रक्तशुद्धीकरणासाठीही मदत करत असतात. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला यांचे सेवन करण्याची आपल्याकडे परंपरा निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2023 why we start hindu new year with bitter taste of neem know true reason yps
First published on: 21-03-2023 at 11:51 IST