How Much Toothpaste You Should Use While Brushing : दैनंदिन दिनक्रमात दात घासणे ही नेहमीची प्रक्रिया आहे. स्वच्छ आणि निरोगी दातांसाठी नियमित दात घासणे गरजेचं असतं. पण दात घासताना विशिष्ट प्रमाणातच टुथपेस्ट घ्यायची असते हे तुम्हाला माहितेय का? तसंच, ब्रश करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितेय का? याबाब इंडियन एक्स्प्रेसने डॉ. सबद्राज अॅडव्हान्स्ड डेंटिस्ट्री सेंटरचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल सबद्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
प्रौढांनी ब्रशवर टुथपेस्ट किती घ्यावी?
वाटाण्याच्या दाण्याइतकी टूथपेस्ट प्रौढांनी घ्यावी, असं डॉक्टर सूचित करतात. कारण, या प्रमाणात दात मजबूत करण्यासाठी आणि जास्त संपर्काचा धोका न घेता पोकळी रोखण्यासाठी पुरेसे फ्लोराइड उपलब्ध आहे , असे डॉ. सबाद्रा म्हणाले.
लहान मुलांनी ब्रशवर टुथपेस्ट किती घ्यावी?
३ वर्षांखालील मुलांनी तांदळाच्या दाण्याएवढा टूथपेस्ट वापरावी. तर, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांनी वाटाण्याच्या दाण्याएवढा टूथपेस्ट वापरावी. कारण, लहान मुलांना ब्रश करण्याची सवय नसते. ते चुकून टुथपेस्ट गिळण्याची शक्यता असते.
मुलांच्या ब्रशिंगवर लक्ष ठेवा : मुलं योग्यरित्या थुंकू शकत नाहीत किंवा तोंड धुवू शकत नाहीत तोवर पालकांनी मुलांच्या दात घासण्यावर लक्ष ठेवायला हवं. निदान सहा वर्षे तरी पालकांनी मुलांच्या ब्रश प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
फ्लोराइड टूथपेस्ट वापरा : दात किडण्यापासून रोखण्यासाठी फ्लोराइड आवश्यक आहे. मुलांसाठी वयानुसार टूथपेस्ट निवडा. फ्लोराइडचं प्रमाण कमी असलेली टुथपेस्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो.
ब्रश केल्यानंतर नेहमी थुंकावे – प्रौढ आणि मुले दोघांनाही नेहमी टूथपेस्ट थुंकावी. परंतु ब्रश केल्यानंतर लगेच दात धुणे टाळा, जेणेकरून फ्लोराइड दातांवर जास्त काळ टिकेल.
जास्त ब्रशिंग टाळा: दिवसातून दोनदा ब्रश करणं पुरेसं आहे. जास्त ब्रशिंग केल्याने हिरड्या खराब होऊ शकतात.
नियमित दंतचिकित्सकांना भेटा : नियमित तपासणीमुळे दातांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यास आणि तोंडाची योग्य स्वच्छता राखण्यास मदत होते.