जिलेबी हे असं पक्वान्न आहे जे आवडत नाही असा माणूस विरळच. गरम गरम जिलेबी आणि फाफडा अशी न्याहारीही काहीजण करतात. तसंच लग्न समारंभ असो किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो. जिलेबी त्या सगळ्याची रंगत वाढवते. सध्याच्या घडीला लग्नांचा इव्हेंट झालाय आणि पंगतीच्या जेवणाची जागा बुफे आणि लाईव्ह काऊंटर्सनी घेतली आहे. तरीही जिलेबीचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्याआधी लग्नात गोड जेवण म्हणजे जिलेबीचंच असंच समीकरण होतं. गाव जेवण घालायचे त्यातही दोन पदार्थ असायचेच जिलेबी किंवा बुंदी. मात्र या जिलेबीचा इतिहास हा मोठा रंजक आहे. भारतीयांना आवडणारं हे पक्वान्न भारतातलं नाही.
काय आहे जिलेबीचा इतिहास?
चौदाव्या शतकात जिलेबीचं आगमन आपल्या देशात झालं. पामिरन साम्राज्यातल्या झलाबिया या शहरावरुन या पदार्थाला जिलेबी हे नाव पडलं. झलबिया शहरातल्या एका हलवायाने मैद्यात यिस्ट घालून आंबवलेल्या पिठात अंडी मिसळली आणि त्याची गोलाकार बिस्किटं तयार करुन त्यावर मध ओतलं. या पदार्थाला त्या हलवायाने नाव दिलं झलाबिया. झलाबिया हे शहर पामिरन साम्राज्याची राणी झेनोबियाने वसवलं होतं. पुढे हे साम्राज्यही लयाला गेलं आणि तिने वसवलेलं शहरही. पण झलाबिया हा पदार्थ राहिला. जो नंतर अरबास्तानात गेला. अरबास्तानात झलाबियाला जलबिया असं म्हटलं गेलं. त्यानंतर जिलेबी हे नाव धारण करुन हा पदार्थ भारतात आला तो अरबस्तानातून. तर असा आहे या जिलेबीचा इतिहास.
जिलेबी भारतात येऊन ५०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला
जिलेबी भारतात आली त्याला ५०० वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र या जिलेबीची रंगत आणि लज्जत वाढतानाच दिसते आहे. जिलेबीचा आणखी एक प्रकार प्रसिद्ध आहे तो म्हणजे इमरती. इमरती आवडणारेही लोक चिक्कार आहेत. त्याचप्रमाणे जिलेबी ही मैद्यापासून तयार केली जाते आणि साखरेच्या पाकात घोळवली जाते. पिवळीधम्मक किंवा केशरी जिलेबी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खव्याची जिलेबी देखील बाजारात मिळते. तिची चवही खूप सुंदर असते. तर असा आहे जिलेबी या शब्दाची माहिती. ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकात ही माहिती लेखक सदानंद कदम यांनी लिहिली आहे.
इराणचा मोहंमद हसन याच्या ‘पाकखाना’ या पुस्तकातसुद्धा जिलेबीसदृश पाककृती आढळते. पंधराव्या शतकात जिनासूर नावाचे एक जैन लेखक होऊन गेले. त्यांच्या एका पुस्तकातल्या वर्णनानुसार, एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी दिलेल्या मेजवानीत जिलेबीसदृश पदार्थाचा उल्लेख आहे. मात्र, त्यात त्या पदार्थाचं नाव ‘कुंडलिका’ असं आहे असं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एका लेखात लिहिलं होतं.
जिलेबीची इतर नावं काय?
झेपली, जिलापी, जिलापीर पाक, जिलाफी, जुलबिया, जेरी, मुराब्बक, कुंडलिका, जलबल्लिका, चासवल्लिका, जलेबा, झलेबिया, जलेबा, जिलबी, जलेबी असंही आपल्या पिवळ्याधम्मक किंवा केशरी जिलेबीला म्हणतात.