Kolhapur’s Name History : कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि राजघराणे या शहराचा भव्य-दिव्य इतिहास सांगतात. कोल्हापूरची रांगडी भाषा, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी साज आणि एवढेच नव्हे, तर येथील खाद्यसंस्कृतीही सातासमुद्रापलीकडे लोकप्रिय आहे. या शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभला आहे. पण तुम्हाला माहितेय का या शहराला कोल्हापूर हे नाव कसे पडले? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

शहराला कोल्हापूर हे नाव कसं पडलं?

कोल्हापूर म्हटले की, डोळ्यांसमोर श्री महालक्ष्मीचे मंदिर येते. कोल्हापूर शहरात येणारी प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही. एका लोकप्रिय आख्यायिकेनुसार, देवी महालक्ष्मीने पती भगवान विष्णूबरोबर झालेल्या भांडणानंतर कोल्हापूरमध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. कोल्हापूर हे नाव एका पौराणिक कथेवरून पडले आहे. देवी महालक्ष्मीने स्थानिक लोकांवर अत्याचार करणाऱ्या कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मरण्यापूर्वी राक्षसाने शेवटची इच्छा व्यक्त केली की, हे ठिकाण त्याच्या नावावरून ओळखले जावे. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव कोल्हापूर असे पडले. ( https://kolhapur.gov.in/en/about-district/-
वरील माहिती कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेली आहे)

कोल्हापूर शहराला राजघराण्यांचा मोठा इतिहास लाभला आहे. कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी म्हणूनही ओळखले जाते. महाराणी ताराबाई यांनी साताऱ्यावरून माघार घेत, कोल्हापूर राज्याची स्थापना केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी १८७४ ते १९२२ मध्ये कोल्हापूर शहराचा मोठा विकास केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज कोल्हापूर हे एक आधुनिक व औद्योगिक शहर आहे. कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. कोल्हापूरमध्ये ओल्ड पॅलेस, न्यू पॅलेस, रंकाळा तलाव, शालिनी पॅलेस, टाऊन हॉल, पंचगंगा घाट, शिवाजी पूल इत्यादी ठिकाणे लोकप्रिय आहे. तसेच येथील कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी साज याशिवाय कोल्हापुरी लवंगी मिरची, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी मटण, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी दूध कट्टा इत्यादी अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.