‘दूरदर्शन’च्या इतक्या वर्षांच्या प्रवासात इतके अनुभव गाठीशी आहेत.. नेमकं काय आठवावं आणि काय सांगावं, असा प्रश्न पडतो. ‘दूरदर्शन’ने त्या वेळच्या आम्हा सर्वाना निर्मितीचा विलक्षण आनंद दिला. ‘शब्दांच्या पलीकडले’सारखा संगीतमय कार्यक्रम एका दिवसात सुरू करू शकले. ध्यानीमनी नसताना दवासला जाऊन कुमारांसारख्या ज्येष्ठ गायकाची अफाट निर्गुणी भजनंसुद्धा चित्रबद्ध करू शकले.. सुख सुख म्हणजे याहून काय असतं?’’ सांगताहेत, ‘दूरदर्शन’च्या निर्मात्या विजया जोगळेकर.
कुठलीशी हसरी धून गुणगुणत भाई मेक अप रूममधून अचानक बाहेर आले आणि घाईघाईत मला विचारलं, ‘‘विजया, तयारी झाली आहे ना सगळी?’’
‘‘हो झालीच आहे. तुम्ही तयार होऊन आलात की लगेच ब्लॉकिंग करू आणि रेकॉर्डिगला सुरुवात करू.’’ मी मोठय़ा आत्मविश्वासाने त्यांना सांगितलं आणि भाई येताहेत म्हणून सगळ्यांना सावधान करायला तशीच स्टुडिओकडे धावले. सगळं कसं चोख आखलेलं.. वेळ वाया गेला असता तर? (दुसरं कोणी असतं तर) ऐन वेळी काही तरी सबब सांगून वेळ निभावून नेता आली असती. पण भाई हे आद्य टेलीव्हिजन प्रोडय़ुसर (परमाचार्य).. त्यात सगळं वेळापत्रक सुनीताबाईंनी खास आखलेलं.. अगदी चहाच्या गॅपसकट.. किमान दोन महिने ही लगीनघाई चालली होती. त्यात भाईंचं रेकॉर्डिग म्हणून भाईंची बरीच मुंबईची स्नेही मंडळी जमली होती. भाई म्हणजे मूर्तिमंत आनंद सोहळा.. सगळे कसे प्रफुल्लित.. ऐतिहासिक क्षणाची वाट बघत.. मी तर क्लाऊड नाइनमध्ये..
काळ- साधारण १९८०
स्थळ – पुण्याची फिल्म इन्स्टिटय़ूट (स्टुडिओ)
चित्रीकरण- पु.लं.चं..‘वाऱ्यावरची वरात’
मुंबईहून आमचे कॅमेरामन, इंजिनीअर्स आणि आम्ही तिघी.. मी आणि डबल माधवी (मुटाटकर आणि कुलकर्णी) आठ दिवसांपासून मुंबई-पुणे करत होतो..
स्टुडिओत सेट (नेपथ्य) तयार होता.. लायटिंग झालं की सुरुवात करायची.. पहिल्यांदा मी निवांतपणे खुर्चीवर बसले आणि दिवसाचा पहिला चहाचा घोट घेतला. एवढय़ात कुणी तरी बातमी आणली की दुपापर्यंत वीजपुरवठा बंद..भारनियमनाचे ते दिवस होते.. कधीही वीज जात होती.. जणू बॉम्बच पडला होता.. आता चित्रीकरण अशक्य.. स्टॅण्ड बाय इन्व्हर्टर असावा ही विचारसरणी सरकारला फारच चैनीची वाटत असावी. सर्वाचे मेकअप तर होतच आले होते.. बातमी भाईंपर्यंत पोहोचलीच.. किमान अर्धा दिवस तरी फुकट जाणार होता. तीन दिवसांत आम्ही ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘रविवार सकाळ’ करणार होतो. सगळं वेळापत्रकच बिघडणार होतं. भाई लगेचच प्रवासाला जाणार होते. माझ्या मनात अनेक शंका-कुशंका यायला लागल्या. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसायला लागले. एवढय़ात पुण्याच्याच एका इंजिनीअरने सुचवलं.. स्वत: ‘पुलं’च जर एम.एस.ई.बी.च्या चीफ इंजिनीअरशी बोलले तर? पण सांगणार कोण.. कशीबशी ही कल्पना भाईंपर्यंत पोहोचली.. ते म्हणाले बघतो बोलून.. आणि फोन लावला.

‘‘अहो इंजिनीअर साहेब मी पु. ल. देशपांडे बोलतोय. फिल्म इन्स्टिटय़ूटमधून.. काय आहे.. आज आम्ही.. ‘वाऱ्यावरच्या वरात’चं रेकॉर्डिग करणार आहोत. सगळी तयारी झाली आहे पण स्टुडिओला लायटिंगला पुरेल असा वीजपुरवठा नाही.. काही करता येईल का?’’ पलीकडून बहुतेक सकारात्मक उत्तर आलं असावं. भाई म्हणाले, ‘‘हो, हो जरूर या.’’ भाईंच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. म्हणाले, ‘‘चीफ इंजिनीअर म्हणाले सपत्नीक आम्ही चित्रीकरण बघायला आलो तर चालेल का?’’ भाईंनी फोन ठेवला. सुनीताबाईंना म्हणाले, ‘‘सुनिता, एखादी साडीबिडी असेल तर तयार ठेव. इंजिनीअर साहेबाचं मेहूण येतंय. आहेर केलेला बरा.’’ सगळा स्टुडिओ हास्यलकेरीत बुडून गेला. ‘पुलं’ या नाममुद्रेची ताकद काय होती हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं.
झांज ढोलकी बोलू लागली आणि ‘दिल देखे देखो’च्या गाण्यावर आणि तालावर श्रीकांत मोघे आणि ‘पुलं’ची जुगलबंदी (अभिनयाची) सुरू झाली आणि सगळ्यांचं जणू ‘मुझे पिलाहो’ झालं. खरोखरीच तीन दिवसांत ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘रविवार सकाळ’ सुविहितपणे संपन्न झालं..
कट टू..

Shani Nakshtra transit will be lucky for these zodiac signs will get so much money and will become rich
Shani Nakshtra : सहा महिन्यापर्यंत शनिच्या कृपेमुळे या राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतात श्रीमंत
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे

वर्ष १९८८.. त्या दिवशी आमचे स्टेशन डायरेक्टर सावदेकर साहेबांच्या खोलीत आमची मीटिंग सुरू होती. एवढय़ात कागदाचं भेंडोळं घेऊन न्यूज रुममधून कुणी तरी धावतच आलं.. सर.. सर.. आनंदाची बातमी आहे. कविवर्य कुसुमाग्रजांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराच्या बातमीने सर्वाचेच चेहरे अगदी मोहरून गेले. मला ती बातमी एक विशेषच पर्वणी वाटली. कारण आतापर्यंत अत्यंत मृदू भाषेत कविश्रेष्ठांनी आमच्या ‘प्रतिभा प्रतिमा’च्या कार्यक्रमाला गोड नकार दिला होता. तो इतका मृदू असायचा की पुढे काही बोलताच येऊ नये. ‘ययाती-देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’- त्यातली आव्हानात्मक पल्लेदार स्वगतं.. ‘विशाखा’मधल्या अर्थगर्भ कविता.. हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलचं पाहिजे असं मनोमन वाटायचं.

13आता आयती संधी आली आहे. आता त्यांना नाही म्हणणं जमणार नाही. मला चित्रीकरण केलंच पाहिजे.. काहीही करून.. सावदेकर साहेब म्हणाले, ‘आकाशवाणी’वर सध्या मधुकर गायकवाड आहेत त्यांना विचारा. मी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांना फोन लावला. ते म्हणाले, ‘‘आमची टीम उद्या सकाळी निघणार आहे. त्यांच्याबरोबर कविवर्य शंकर वैद्य जाणार आहेत.’’ वैद्य आमचे सख्खे शेजारी.. मी लगेच आमची टीम तयार केली. पावसाचे दिवस होते. शंकर वैद्यांना घरी जाऊन विचारलं, ‘‘तुम्ही ‘दूरदर्शन’साठी देखील मुलाखत घेऊ शकाल ना?’’ ते ‘‘हो’’ म्हणाले पण ‘‘फक्त संध्याकाळी माझा ठाण्याला गणपती उत्सवानिमित्त कार्यक्रम आहे, आपल्याला ते लक्षात घेऊन निघावं लागेल.’’ मला जरा धडकीच भरली पण ती न दाखवता (हे नेहमीचच) मी तयारीला लागले.
सकाळी ६ वाजता.. ‘आकाशवाणी’ची मोठी जीप आली. बरोबर विजय अनिखिंडी, कॅमेरामन. मुंबई- नाशिक त्या वेळचा रस्ता म्हणजे प्रत्येक दोन फुटांवर ४ खड्डे. तसेच आम्ही नाशिकमध्ये शिरलो.. तर आड दिवशी नाशकात चक्क दिवाळी..

तात्यांच्या बंगल्यावर फाटकापासूनच हारतुऱ्यांची रांग लागली होती. स्वत: तात्यासाहेबच प्रसन्न मुद्रेने बाहेर आले.. वैद्य सरांचं स्वागत केलं.. मला बघून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण नाराजी दिसली नाही. मी खूष.. ‘‘वैद्य ‘दूरदर्शन’साठी सुद्धा तुमची मुलाखत घेतील चालेल ना?’’ मी विचारलं.

‘‘हो चालेल, दहा-पंधरा मिनिटे बोलू की,’’ तात्यांचा आश्वासक स्वर.. ‘‘तुम्ही फ्रेश व्हा.. चहा सांगतो कोणाला तरी..’’ आम्ही लगेच तयारीला लागलो. लाईट्सचा स्टॅण्ड काढला.. लाईट्स बसवले.. आणि लक्षात आलं की इथे वीजच नाही. कॅमेरा असिस्टंटनं इकडे-तिकडे बघितलं.. तात्यासाहेब म्हणाले, ‘‘अरेच्चा माझ्या लक्षातच नाही आज गुरुवार ना आज वीज खंडित.’’
एम.एस.ई.बी. आणि ‘दूरदर्शन’चं गेल्या जन्मात काही तरी बिनसलं असावं..

आधी ‘पुलं’ आणि आता कुसुमाग्रज.. विजेचा नकार.. आता काय करणार? अनिखिंडी म्हणाले, आधी पुस्तकं, फोटो, त्यांचे लिहिताना वगैरे शॉट्स घेतो तोपर्यंत तुम्ही काही तरी मार्ग काढा. तोपर्यंत वैद्यसर, आम्ही तात्यासाहेबांशी प्रश्नांबद्दल ठरवत होतो. माझ्या मनात आलं.. इतकी छान बाग आहे. वीज नाही तर बागेतच शूटिंग करू. नैसर्गिक प्रकाश मिळेल. ढगाळ आकाश म्हणजे कॅमेऱ्याला फारच पोषक प्रकाश. बाहेर अंगणात खुच्र्या लागल्या. तात्यासाहेबांच्या समोर कॅमेरा ठेवला. मुलाखतीला सुरुवात करणार तोच.. सभोवती कावळ्यांनी काव-काव करायला सुरुवात केली ती इतकी की तिथे बसणंदेखील अशक्य व्हावं. शूटिंग करणं तर शक्यच नव्हतं. मी बागेत एकटीच कावळ्यांच्या शाळेत.. बंगल्याभोवती तात्यांच्या चाहत्यांची अपार गर्दी.. दयनीय चेहेरा करून कावळ्यांच्याकडे बघत बसले.. काव-काव थांबण्याची वाट बघत.. कदाचित् त्यांना माझी दया आली असावी. अध्र्या एक तासांनी कुणी तरी आदेश दिल्याप्रमाणे सर्व कावळे एकदम शांत झाले आणि मुलाखतीला सुरुवात झाली.. आणि वीस मिनिटांच्या चार टेप्स, ८० मिनिटे मुलाखत झाली. दहा-पंधरा मिनिटांऐवजी चक्क पाच पट मजकूर हाती लागला होता. तात्यांनी भरभरून दिला होता, हातचं काही राखून न ठेवता. मी आनंदात होते. आता वैद्यसरांसमोर कॅमेरा ठेवून सर्व प्रश्न घ्यायचे.. पण तोवर दीड-दोन वाजले होते. तात्यासाहेबांना विश्रांतीची गरज होती. आम्हालाही सगळ्यांना भुका लागल्या होत्या. शिवाय वैद्यसरांचा रात्री कार्यक्रम होता. तिथलं सर्व सामान आवरून तात्यासाहेबांचे भरभरून आभार मानले.
‘‘आता झालं ना मनासारखं,’’ सुस्मित शांत स्वरात त्यांनी विचारलं. पुढे म्हणाले, ‘‘विजयाबाई, प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते.’’ मी वाकून नमस्कार केला आणि आम्ही निघालो.

‘आकाशवाणी’वर ते लगेच दुसऱ्या दिवशी प्रक्षेपण करणार होते, पण मला वैद्यांचे प्रश्न वेगळे घेऊन शूट करायचं होतं. नाटय़पदं, स्वगतं जमवायची होती. दूरदर्शनच्या मनोऱ्याखाली बागेसारखी जागा होती. तिथे वैद्यांचे सर्व प्रश्न घेतले. संकलन केलं आणि रविवारी सकाळी ९ वाजता प्रक्षेपण सुरू झालं आणि तात्यासाहेबांच्या प्रसन्न प्रगल्भ दर्शनामुळे प्रत्येक मराठी घरात जणू सणच साजरा झाला.
अशी असते पॉवरकटची पॉवर..
सुरुवातीच्या काळात मी याकुब सईद यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून काम करत होते. कार्यक्रम होता ‘किलबिल’. याकुबांचं काम चोख असे. ते अव्याहत काम करायचे. खायचे नाहीत. बसायचे नाहीत. सतत उभेच्या उभे.. नंतरच्या काळात ‘किलबिल’ कार्यक्रमाची मी निर्माती होते. तेव्हाची गोष्ट. गोरेगावच्या एका मूकबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चित्रित करायचा होता. आधी दोन तालमी घेतल्या. त्यांना स्टुडिओच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून. मग रेकॉर्डिगला सुरुवात करणार एवढय़ात आमच्या तंत्र-दिग्दर्शकांनी सांगितलं की आणखी तालीम पाहिजे. त्यांचा हेतू चांगला होता म्हणजे लायटिंग आणखी चांगलं झालं असतं. पण त्यामुळे दुपारच्या रेकॉर्डिगला फार कमी वेळ मिळाला असता शिवाय मुलांच्या एकूण शारीरिक परिस्थितीमुळे मी म्हटलं की, ‘‘आता आपल्या दोन तालमी झाल्या आहेत. त्यांच्या शारीरिक परिस्थितीमुळे तुम्ही जरा सांभाळून घ्या. त्यांना परत परत सांगणं मला कठीण जात आहे. आपण त्यांना सांभाळून घेऊ . चुकलं तरी क्षम्य आहे. पण ते अडूनच बसले. खोळंबा व्हायला लागला. काय गोंधळ झाला म्हणून आमचे केंद्र निर्देशक (म्हणजे डायरेक्टर टी. व्ही. सेंटर) वरती तांत्रिक विभागाकडे आले. तावातावाने तंत्र निर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) बोलत होते. आम्ही हे रेकॉर्डिग होऊ देणार नाही. ‘‘वी वॉन्ट वन मोर रिहर्सल. वी वोन्ट रेकॉर्ड.’’ वगैरे संपासारखी भाषा करू लागले. पाहता पाहता प्रोडय़ुसर विरुद्ध इंजिनीअर्स असं वळण लागलं. वातावरण चांगलंच गरम झालं होतं. ‘दूरदर्शन’चे बरेच कर्मचारी तिथे जमले होते. काही माझ्या बाजूने काही त्यांच्या बाजूने. खाली स्टुडिओत सगळी बिचारी मुलं खोळंबून राहिली होती. एवढय़ात मला सपोर्ट (पाठिंबा) म्हणून सर्व निर्मातेदेखील जमा झाले. मला म्हणाले, ‘‘विजया रेकॉर्डिग करू नको. तुझं म्हणणं बरोबर आहे, आमचा तुला पाठिंबा आहे.’’ आमचे शास्त्रीसाहेब (केंद्रप्रमुख) म्हणाले, ‘‘ते काही नाही. तू आजच रेकॉर्डिग पूर्ण कर. मी इंजिनीअर्सना सांगतो.’’ पण सर्व निर्माते म्हणाले, ‘‘रेकॉर्डिग रद्द कर.’’ एका बाजूला मला पाठिंबा देणारे निर्माते आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य. सगळेच इरेला पेटलेले. माझी अवस्था फारच बिकट होती. स्टुडिओत ती असहाय मुलं दिसत होती आणि दुसऱ्या बाजूला माझी मानहानी वाचवण्यासाठी सर्व निर्माते माझ्या बाजूने उभे होते. केंद्रप्रमुखांचा रोष पत्करून.. पण.. मग मला मुलांचे चेहेरे नजरेसमोर आले. ती मुलं गोरेगावहून आली होती. आपला कार्यक्रम टीव्हीवर दिसेल या जाणिवेने..
माझा अपमान मी गिळला..

आमच्या केंद्रप्रमुखांना मी सांगितलं, ‘‘मी रेकॉर्डिग पूर्ण करते.’’ तोपर्यंत चार वाजले होते. मी निमूटपणे रेकॉर्डिग पूर्ण केलं. सर्व निर्माते माझ्यावर प्रचंड नाराज होऊन परत गेले होते. हिची बाजू घेण्यात काही अर्थ नाही असं म्हणाले असणार. फक्त आमचे ‘दूरदर्शन’ गुरू केशवराव केळकर म्हणाले, ‘‘विजया, तू योग्यच केलंस.’’ असे अनेक प्रसंग येतात पण आपली सदसद्विवेकबुद्धी काय म्हणते ते मानावं असं मला वाटतं. न्याय्य असलं तरी परिस्थिती बघून पडतं घ्यावं लागतं. जसे तणावाचे प्रसंग येतात तसे गमतीचे देखील येतात.

चिमणराव मालिकेत ‘चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात’ हा भाग चित्रित करायचा होता. ज्ञानेश्वरी अर्थात खाली म्हणजे जमिनीवर बसून वाचायची.. म्हणजे सर्वजण खाली बसणार.. कॅमेरा पाच फुटावर म्हणजे कलाकारांच्या चेहेऱ्यापेक्षा डोकीच दिसणार म्हणून मी कॅमेरे खाली उतरवायचं ठरवलं. खाली ट्रॉलीवर कॅमेरे ठेवले. कॅमेरामन खाली जमिनीवर बसले.. जवळजवळ झोपूनच चित्रीकरण करत होते. मोठे मजेदार दृश्य होतं ते. चिमणराव-गुंडय़ाभाऊ , आई-मधूनमधून मोरू, मैना आणि काऊ.. शिवाय शेजारच्या एक बाई. हे काम ज्योतीताई म्हणजे ‘पुलं’च्या बहिणीने केलं होतं. त्या बाजारात जाऊन पिशवी हातात घेऊन बसतात असं दृश्य होतं. चि.विं.च्या मूळ कथेत शेजारच्या बाईंच्या पिशवीतून खेकडा बाहेर येतो असं होतं. आम्ही फक्त हे ज्योतीताईंना सांगितलं होतं आणि त्या खरोखरीच खेकडा घेऊन आल्या होत्या. बाकी कोणालाच पिशवीमध्ये खेकडा आहे हे माहीत नव्हतं. चित्रीकरण सुरू झालं. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचायला लागतात. शारदा स्तवन करताना.. ‘नि:शेष जाड्डय़ा पहा’ म्हणताना.. मुद्दाम ‘जाडय़ा पहा’ म्हणून चिमण गुंडय़ाभाऊकडे बघतो. पुढे वाचायला लागतो.. ज्ञानेश्वरीतल्या फाटक्या पानाला.. मोरूने रहस्यकथेचे पान चिकटवलेले असते.. हा सर्व गोंधळ चालला असताना अचानक ज्योतीताईंच्या पिशवीतून मूळ कथेबरहुकूम खरोखरीच खेकडा बाहेर येतो. स्टुडिओत कोणालाच हे अपेक्षित नव्हतं. सर्वाची तारांबळ उडते. आडवे झालेले कॅमेरामन धडपडत उभे राहिले. खेकडाच तो, त्याला पकडणार कोण? नुसती धमाल. मी ती अनपेक्षित धमाल चित्रित करते आणि रेकॉर्डिग थांबवते. ज्योतीताई शांतपणे तो खेकडा पिशवीत टाकतात. सगळ्यांना रहस्याचा उलगडा होतो आणि एक अफलातून सिन/शॉट मिळाल्याचा आनंद आम्हा सर्वाना होतो. मग परत पुढची दृश्य टिपण्यास आम्ही सज्ज होतो. पण या गमतीने सर्वाची आधीच हसूनहसून पुरेवाट झाली.. आणि कथेत सांगितल्याप्रमाणे खेकडय़ानेही आपली भूमिका अगदी चोख बजावली होती.

बरेच वेळा असं वाटायचं की, काही प्रतिभावंत व्यक्ती केवळ दूर आहेत, आपल्या आवाक्याबाहेर आहेत म्हणून त्यांचा कार्यक्रम होऊ शकत नाही. उदाहरणार्थ विख्यात कवी ना. घ. देशपांडे. ना. घ. राहायचे मेहेकरला.. इतक्या दूर जाऊन चित्रीकरण करणं अशक्य वाटायचं. कारण शूटिंगकरिता आमची सर्व सर्कस बरोबर असायची.. पण आमच्या केंद्र निर्देशकांनी, सावदेकरांनी मला मार्ग दाखवला. मी, मुलाखतकार, माझे साहाय्यक मुंबईहून जायचो आणि कॅमेरा-लाईट्स नागपूर केंद्राहून मागवायचे.
मी, विजया राजाध्यक्ष, मुलाखतकार आणि साहाय्यक विकास कशाळकर मुंबईहून बुलढाण्याला गेलो. तिथे प्रसिद्ध लेखिका आशा बगे होत्या. विजयाबाईंमुळे त्यांची भेट झाली. अतिशय अगत्याने त्यांनी आमचं स्वागत केलं. वऱ्हाडी आतिथ्याचा परिचय झाला.. तेवढय़ात नागपूरची मोठी व्हॅन आली. कॅमेरा, लाईट्स, कॅमेरामन पाणिशर, देशमुख वगैरे तिथून आम्ही मेहेकरला गेलो.

विलक्षण सुंदर गाव.. निसर्गाने नटलेलं.. माझे वडील नेहमी ना. घ. देशपांडय़ांची गीतं म्हणायचे. ‘फार नको वाकू जरी उंच बांधा’, ‘राना-रानात गेली बाई शीळ’. एक संपूर्ण पिढी, नाघंमुळे नाघमय आणि नादमय होऊन गेली होती. एका संपूर्ण पिढीला त्यांनी अनोख्या आणि अमूर्त आणि गूढ प्रेमाचा नजराणा पेश केला होता. अशा कविवर्य ना. घ. देशपांडे यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी आमचं यथोचित स्वागत केलं. बरोबर विजयाबाई असल्यामुळे अर्थातच फरक पडला. ना.घ. कविश्रेष्ठ असले तरी पेशाने ते वकील होते. गंमत म्हणजे आम्ही येणार, आम्हाला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी त्यांची खोली, जिथे त्यांचे पक्षकार येत, ती पांढऱ्या शुभ्र रंगाने रंगवून घेतली होती. आत एक टेबल, खुर्ची आणि समोर तीन खुच्र्या. मी आणि कॅमेरामन बघतच राहिलो.. पांढऱ्या रंगाकडे.. त्या काळी चित्रीकरणाला पांढरा रंग म्हणजे जणू शापच होता. शिवाय खोली पण लहानच होती. मी त्यांना म्हटलं, खोलीत कशाला शूटिंग करायचं इतकं सुंदर मेहेकर गाव असताना..

तुमच्या त्या कवितेच्या ‘काळ्या गढीच्या जुन्या.. ओसाड भिंतीकडे’ त्याच्या पाश्र्वभूमीवर करू या नं चित्रीकरण.. विजयाबाई पण खूष झाल्या. ना.घ. म्हणाले ते सर्व कवितेत, पण प्रत्यक्षात मी अर्धा तासही बाहेर पडू शकत नाही. अहो माझी तब्येत ठीक नसते. मला तिथपर्यंत येणं शक्य होणार नाही. मी म्हटलं, ‘अहो आमची मोठी गाडी आहे. तुम्ही अगदी झोपून येऊ शकता. आपण अगदी सावकाश जाऊ.’ विजयाबाईंनी पण आग्रह केला. शेवटी दोन विजयांच्या आग्रहामुळे ते कसेबसे तयार झाले. त्या ऐतिहासिक काळ्या गढीच्या भग्न पण बोलक्या अवशेषांपुढे, त्या अवशेषांना बोलतं करणाऱ्या कविराजांना घेऊन आम्ही चित्रीकरण सुरू केलं. मी नवव्या ढगात. (ू’४ िल्ल्रल्ली चे भाषांतर) पहिल्या वीस मिनिटांचं रेकॉर्डिग झालं आणि ते अचानक थांबले म्हणाले, ‘‘आपण घरी जाऊ या. मला आता बसवत नाही.’’ इलाजच नव्हता. आम्ही घरी गेलो. ते विश्रांती घेत होते. तोपर्यंत आम्ही त्यांची पुस्तकं, त्यांच्या गीतांच्या रेकॉर्ड्स (तबकडय़ा) वाजवून शूट केल्या. सर्व झाल्यावर त्यांना म्हटलं.. आता उरलेली मुलाखत आपण तुमच्या दिवाणखान्यात घेतली तर चालेल का? ते म्हणाले, ‘‘तो हॉल माझ्या भावाचा आहे. आपण रात्री पुढचं काम करू शकतो.’’ दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं. तेव्हा रात्री शूटिंगची कल्पना चांगली होती. त्यांच्या भावाचा दिवाणखाना प्रशस्त होता. प्रसन्न होता. आम्ही ऐसपैस मुलाखत शूट केली. ते स्वत:पण चांगल्या मूडमध्ये होते. त्यांनी त्यांचीच, ‘तुझ्याचसाठी कितींदा..’, ‘वेडा अमीर माझा..’, ‘बाई कुठे बघावा..’, ‘अंतरीच्या गूढ गर्भी..’ सारखी गीतं म्हणून दाखवली. त्यामुळे तेही खुलले, खूपच आनंदात होते. काळ्या गढीनं इतक्या वर्षांनंतर मौन सोडलं होतं..
‘दूरदर्शन’च्या इतक्या वर्षांच्या प्रवासात इतके अनुभव गाठीशी आहेत.. नेमकं काय आठवावं आणि काय सांगावं, असा प्रश्न पडतो. ‘दूरदर्शन’ने त्या वेळच्या आम्हा सर्वाना निर्मितीचा विलक्षण आनंद दिला. कोणाचा विश्वास बसणार नाही पण आमच्यावर कसलंच बंधन नव्हतं. कल्पना यायचा अवकाश की आम्ही कार्यक्रम करू शकत होतो.. ‘शब्दांच्या पलीकडले’सारखा संगीतमय कार्यक्रम एका दिवसात सुरू करू शकले. पहिल्याच कार्यक्रमात बाबूजी, ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको’ लाइव्ह म्हणजे थेट गायले. ज्या चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकरांनी गाजवली होती, तोच चिमण म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि गुंडय़ाभाऊ म्हणजे बाळ कर्वे असं समीकरण होऊ शकलं. ध्यानीमनी नसताना देवासला जाऊन कुमारांसारख्या ज्येष्ठ गायकाची अफाट निर्गुणी भजनसुद्धा चित्रबद्ध करू शकले..
सुख सुख सुख म्हणजे याहून काय असतं?

– विजया जोगळेकर धुमाळे
vijayadhumale@gmail.com