राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून मी अभिनयाचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करून आलो होतो. अभय सरांच्या हाताखाली घालवलेली ‘वादळवाट’ची साडेतीन वर्षे ही माझी लेखनाची शाळा होती. वादळवाट’च्या बरोबरीनंच आम्ही २००४ साली संगीत कुलर्णीची ‘तुझ्याविना’ ही मालिका लिहायला घेतली. यतीन कार्येकर, वर्षां उसगांवकर यांच्याबरोबर मराठीतले अनेक आघाडीचे अभिनेते या मालिकेत होते. आजची आघाडीची अभिनेत्री ऊर्मिला कोठारे (कानिटकर) हिची ती पहिलीच मालिका. गोष्ट अभय सरांचीच होती. एक पिता आणि त्याच्या दोन मुलींच्या संघर्षांची ही कथा. ‘वादळवाट’प्रमाणेच इथंही मी अभय सरांबरोबर लेखन साहाय्यक म्हणून होतो. पण मालिकेच्या दरम्यान अभय सरांचं आणि निर्माता-दिग्दर्शक संगीत कुलकर्णीचं कशावरून तरी बिनसलं. खरं तर दोघंही उत्तम मित्र. पण ‘तत्त्वा’च्या कुठल्या तरी मुद्दय़ावरून वाद झाला आणि अभय सरांनी जाहीर करून टाकलं की, ‘‘मी संवाद लिहिणार नाही. इथून पुढे चिन्मयच लिहील.’’ घरातल्या मोठय़ा माणसांच्या भांडणात घरातली लहान मुलं गांगरून इथं-तिथं पाहू लागतात तशी माझी अवस्था झाली. आता अख्ख्या मालिकेचे संवाद आपणच लिहायचे? तोपर्यंत अभय सरांच्या पाठीशी असण्याची सवय झाली होती. आपल्या लेखनात काही चुकलंच तर सर ते दुरुस्त करून पुढे पाठवतात. आपली भूमिका ही ‘पिचहिटर’ची आहे. जबाबदारी अंगावर घेऊन खेळी उभारण्याचं प्रेशर आपल्या खांद्यावर नाही. ही भावना खूप मोकळं वाटायला लावणारी होती. पण या मोठय़ांच्या वादात आपला उगीच बळी गेलाय असं मला सुरुवातीला वाटलं. मग घाबरत बिचकत का होईना, ती जबाबदारी मी अंगावर घेतली. ‘तुझ्याविना’ ही मालिका फारशी चालली नाही. दीडशे भागांच्या आतच ती संपली. ज्या दिवशी मालिका संपत असल्याचं कळलं त्या दिवशी मी ट्रॉम्बेच्या ‘एस्सेल स्टुडियो’मध्ये ‘वादळवाट’चं चित्रीकरण करीत होतो. आणि नेमकं त्या दिवशी अभय सरही सेटवर आले होते. चित्रीकरण संपल्यावर आम्ही कुठे तरी जेवायला गेलो. अभय सर विचारात पडल्यासारखे वाटले. मी मात्र रिलॅक्सड् होतो. ‘‘चला! माझ्या खांद्यावरची एक जबाबदारी संपली,’’ मी बोलून गेलो. अभय सरांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. ‘‘आयुष्यभर अभय परांजपेचा असिस्टंट म्हणूनच राहायचंय का? तू इंडिपेंडंटली लिहीत होतास. चालली असती सीरियल तर तुझा फायदा झाला असता.’’ सर म्हणाले. ‘‘तसं नाही सर, पण..’’ ‘‘‘तुझ्याविना’ चालली नाही याला तू जबाबदार नाहीयेस. पण मी तुझ्या जागी असतो तर मी स्वत:ला जबाबदार धरलं असतं. मोठं होण्याची पहिली पायरी आहे ती. घडणाऱ्या गोष्टींसाठी स्वत:ला जबाबदार धरणं.’’ ‘वादळवाट’मध्ये आबा चौधरी आणि रमा या बाप-लेकीचे अनेक सीन्स असे असायचे, जेव्हा वैचारिक गोंधळात सापडलेल्या रमाला आबा अत्यंत परखडपणे चार शब्द सुनावून तिचा गोंधळ दूर करीत. त्या रात्री अभय सर आबा होते आणि मी रमा. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या याच वाक्यानं मला बळ दिलं.

मैत्री करण्याचे आणि ती निभावण्याचे त्यांचे ‘उसूल’ही अजब होते. संगीत दादा त्यांचा जुना मित्र. ‘तुझ्याविना’च्या वेळी त्यांचा वाद झाला खरा, पण त्याचं भांडवल करून कुणी त्याच्या उखाळ्या-पाखाळ्या काढायला बसलं तर चिडायचे. एकदा मी त्यांना छेडलंही, ‘‘सर, तुम्ही त्याला मित्र म्हणता, पण मग तरी तुमचा वाद झाला म्हणून तुम्ही मालिका लिहायची सोडलीत!’’ ‘‘तो तत्त्वाचा वाद आहे. तिथं माझ्या दृष्टीनं तो चुकीचाच आहे आणि त्याच्या दृष्टीनं कदाचित मी. पण याच संगीतनं माझ्यासाठी ट्रेनमधून उडी मारली होती हे मी कधीच विसरणार नाही.’’ किस्सा असा होता की, एकदा कुठून तरी  बाहेरगावहून परतताना हे दोघे ट्रेननं परतत होते. बाहेरगावच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा सांताक्रूझ वगैरे स्टेशनांवर कधी थांबत नाहीत. पण त्या दिवशी नेमकी ती गाडी सांताक्रूझच्या अलीकडे खूप मंदावली. दादपर्यंत फरपटत जाऊन पुन्हा मागे येण्याचा प्रवास वाचेल म्हणून सांताक्रूझ स्टेशनवर गाडीचा वेग कमी असताना अभय सरांनी गाडीतून उडी टाकली आणि त्यांचा अंदाज चुकून ते प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्या मधल्या मोकळ्या जागेत पडले. ‘‘स्वत:च्या डोळ्यानं स्वत:चं मरण पाहणं म्हणजे काय? ते त्या दिवशी कळलं. मी कुशीवर पडलो आणि ट्रेनची सगळी चाकं अश्शी नाकासमोरून गेली.’’ इजा अजिबात झाली नव्हती, पण अख्खीच्या अख्खी ट्रेन आपल्या नाकापासून काही इंचांवरून निघूण जाणं म्हणजे काय, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नेमकं काय घडलंय हे गाडीत असलेल्या संगीत दादाच्या लक्षात यायला काही सेकंद गेले असतील. लक्षात आलं तोपर्यंत डब्यानं सांताक्रूझ स्टेशनचा प्लॅटफॉर्म सोडला होता. ट्रेन वेग पकडत होती. पुढचा-मागचा कसलाही विचार न करता संगीत दादानं गाडीतून उडी टाकली होती. आणि मग स्वत:ला सावरून तो उलटा सांताक्रूझ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर धावत आला होता. ‘‘तो येईपर्यंत मला लोकांनी प्लॅटफॉर्मवर ओढला होता. मी तसाच फतकल मारून बसलो होतो. प्लॅटफॉर्मवर सिगरेट ओढत.’’ असे हे मित्र. एकूणच मित्र हे अभय सरांचं व्यसन होतं. त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे आणि नो नॉनसेन्स स्वभावामुळे अनेकांना ते माजोरडे वगैरे वाटले असतील कदाचित. पण एकदा दोस्ती केली की त्या दोस्तीत होणारी भांडणं ही दिलखुलासपणे करायची वृत्ती. ‘वादळवाट’ची पटकथा करताना जर कधी निर्माते शशांक सोळंकी बरोबर असले तर तिथंही हे दोघं मित्र अनेकदा इरेला पेटायचे. कथेच्या आणि पटकथेच्या बाबतीत ‘फायनल’ शब्द अभय सरांचाच असणार आहे हे माहीत असूनही शशांक सर आपलं म्हणणं अटीतटीनं मांडायचे. एकदा बोलता बोलता शशांक सरांनी चिडून आपल्या हातातला रायटिंग पॅड आपटला. अभय सरही पेटले. ‘‘तुला काय वाटलं, मला नाही आपटता येत?’’ असं म्हणून त्यांनी सरळ स्वत:चा कीबोर्ड उचलून आपटला. ‘‘वस्तू आपटून मुद्दा सिद्ध होत नसतो. मुळात मुद्दय़ात दम असावा लागतो,’’ असं म्हणून त्या वादाचं भरतवाक्य करून टाकलं. ‘‘तुम्ही बघा काय ते. मला उद्यापर्यंत स्क्रीनप्ले शूटिंगसाठी हवाय,’’ असं म्हणून सोळंकी निघून गेले. अभय सर काही वेळ खिडकीबाहेर पाहत राहिले, मग माझ्याकडे न बघताच म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी मी आपटायला कीबोर्ड उचलला तर मला लगेच अडवायचं. पैसे वर नाही आलेत आपले. कळलं का?’’ मी कसंबसं हसू आवरत मान हलवली. टेलिमार्केटिंगचे कॉल करणाऱ्यांबरोबर त्यांचा संवाद ऐकणं हा तर सोहळा असायचा. ‘‘कैसा बात करता है तुम. तुमको मेरे को क्रेडिट कार्ड बेचने का है के नहीं? तो पहले ठीकसे बात करो. अभी थोडा रुको और..’’ मग मध्येच फोनवर हात ठेवून मला विचारलं, ‘‘स्पष्ट शब्दोच्चाराला काय म्हणायचं हिंदीत?’’ ‘‘साफ जबान चालेल,’’ मी माहिती पुरवली. ‘‘हां, अभी रुको और साफ जबान में बोलो,’’ असं म्हणत त्यांनी एकदा क्रेडिट कार्ड विकू पाहणाऱ्या एका मुलीला जेरीला आणलं होतं. अर्थात हे सगळं कामात नसतील तर. कामात असताना फोन बंदच करायचे.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

‘आपल्या टर्मस्वर आयुष्य जगता आलं पाहिजे’ या तत्त्वावर त्यांची खूपच श्रद्धा होती. आणि म्हणूनच हळूहळू जास्तीत जास्त चॅनलशरण होत जाणाऱ्या मालिकाविश्वात ते नंतर रमेनासे झाले. ‘वादळवाट’च्या वेळी चॅनलची लुडबुड वगैरे शब्दप्रयोगच अस्तित्वात नव्हते. त्या काळात लेखक मालिका लिहायचं काम करीत. दिग्दर्शक ती दिग्दर्शित करायचे. चॅनलचा फीडबॅक, कथा कशी पुढे जायला हवी यावर क्रिएटिव्ह हेडचं मार्गदर्शन वगैरे गोष्टीच तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. एकमेकांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकून तेव्हा मालिकाविश्वाचा कारभार चालत असे. ‘लेखकांना आपण शिकवलं नाही तर त्यांना नेमकं काय आणि कसं लिहायचं ते कळणारच नाही,’ हे वाहिन्यांना वाटण्याचा काळ जसजसा उदयाला येत गेला तसतशी अभय सरांसारख्या लेखकांची घुसमट सुरू झाली. २००३ साली सुरू झालेली ‘वादळवाट’ २००७ साली संपली. त्याच दरम्यान मला पल्लवी जोशींचा फोन आला. ‘वादळवाट’च्या जागी ‘असंभव’ नावाची नवीन मालिका सुरू होत होती, त्याचे संवाद लिहिण्यासाठी. त्यांना माझा होकार कळवूनच मी तिथून बाहेर पडलो. बाहेर आल्यावर जाणवलं, आपण अभय सरांना कळवलंच नाहीये. संध्याकाळी त्यांना भेटायला गेलो. ‘‘सर मला डायलॉग रायटिंगसाठी इंडिपेंडंटली एक सीरियल मिळतेय.’’ मी थोडं बिचकतच सांगितलं. ‘‘कुठली?’’ अभय सरांनी विचारलं. ‘‘आपल्या ‘वादळवाट’च्या जागीच सुरू होतेय ती, ‘असंभव’’’ ‘‘आधी ती सीरियल मीच लिहिणार होतो. सुरुवातीचं काही काम केलं होतं पल्लवीला भेटून. पण नाही जुळून आलं. तू करतोयस? ऑल द बेस्ट.’’ सरांनी हात पुढे केला. त्या दिवशी त्यांच्याकडून निघताना मला उगीच चुकचुकल्यासारखं  झालं. वडिलांचं घर सोडून स्वतंत्र चूल मांडताना मुलाला होतं तसं!

– चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com