कोल्हापुरात सर्वाधिक मतदान, पुण्यात मात्र निरुत्साह

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मंगळवारी सरासरी ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडेलेला नाही.

या टप्प्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह २४९ उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ६५.७० टक्के तर सर्वात कमी म्हणजे ४३.६३ टक्के मतदान पुण्यात झाले. राज्यातील अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती या तिसऱ्या टप्प्यातील अनेक मतदारसंघांमध्ये होत्या. त्यात अहमदनगरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुजय विखे-पाटील विरुद्ध संग्राम जगताप, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल, माढामध्ये राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर, रायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गिते विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, हातकणंगलेमध्ये खासदार राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे खासदार विनायक राऊत विरुद्ध स्वाभिमानचे निलेश राणे, सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील विरुद्ध वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील या लढतींचा समावेश आहे.

मतदानाची वेळ संपल्यावरही काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. राज्यात कुठेही गडबड अथवा अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये उस्फूर्तपणे मतदान

कोल्हापूर : लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी होत कोल्हापूर व हातकणंगले या कोल्हापूर जिल्ह्यतील दोन्ही मतदार संघांत मंगळवारी उस्फूर्तपणे मतदारांनी मताचे दान केले. सायंकाळी मतदानाची वेळ संपली तरी अनेक केंद्रात मतदार मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दोन्हीही मतदार संघात ७० टक्कय़ांहून अधिक मतदान झाल्याने चुरस दिसून आली. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने वेगळे उपR म राबविल्याने त्याचे कौतुक होत राहिले.

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यतील दोन्ही मतदार संघांत काटाजोड लढती होत आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना शिवसेनेचे गतवेळचेच उमेदवार संजय मंडलिक यांनी कडवे आव्हान दिले आहे. तर, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी भगवे आव्हान उभे केले आहे. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीनेही आपले वेगळे अस्तित्व दाखवले आहे. यामुळे जिल्ह्यत मोठी चुरस झाल्याचे दिसत आहे. आज झालेल्या मतदानातून त्याची प्रचिती आली.

आज सकाळपासून कोल्हापूर शहरातील बहुतेक केंद्रावर मतदारांची गर्दी होती. नागाळा, ताराबाई पार्क या उच्चभ्रू वसाहतीमधील केंद्रात सकाळपासून गर्दी राहिली. नागाळा पार्कमधील विवेकानंद कॉलेजमधील एका ठिकाणी सखी मतदान केंद्र केंो होते. तेथे सर्व निवडणूक कर्मचारी महिलाच होत्या. या परिसरासह भोसलेवाडी, कदमवाडीमधील केंद्रातील मतदारांना यादीतील नावे लवकर सापडत नव्हती. अनेकांची नावेच गायब झाली होती. सकाळी विजयादेवी घाटगे स्कूल मतदान केंद्रातील एक निवडणूक यंत्र काही काळ बंद पडले. अध्र्या तासात दुसरे यंत्र आणून जोडल्याने मतदान प्रRि या पूर्ववत झाली. घाटगे स्कूलमध्ये सकाळी दहापर्यंत तुरळक गर्दी होती. सुरुवातीला येथील मतदान यंत्रात बिघाड झाले. यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. केंद्राध्यक्षांनी ते यंत्र बदलून नवीन बसवले. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

उमेदवारांचे सहकुटुंब मतदान

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांनी सहकुटुंब मतदान करण्याला प्राधान्य दिले. धनंजय महाडिक, संजय मंडलिक, राजू शेट्टी व धैर्यशील माने यांनी पत्नी, मुले यांच्यासह मतदान केले. त्यांनी सामान्य मतदारांप्रमाणे मतदार रांगेत उभे राहणे पसंत केले. त्यांच्या या कृतीचे मतदारांनी स्वागत केले. मतदान झाल्यानंतर उमेदवारांनी मतदारांना हात जोडून अभिवादन केले.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची लगबग

विवेकानंद कॉलेजमधील सर्वच केंद्रात रांगा राहिल्या. शंभर मीटर अंतराबाहेर विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना यादीतील नाव शोधून काढण्यासाठी मदत केली. केंद्राजवळ निवडणूक प्रशासनाने मतदार सहायता कक्ष सुरू केले होते. या ठिकाणीही महिला कर्मचारम्य़ांची संख्या अधिक होती. केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदारांना काही काळ आश्चर्य वाटायचे. येथे एकही पुरुष कर्मचारी का नाही याचे. यासंबंधी अनेक मतदारांनी बाहेर थांबलेले पोलिस, निवडणूक कर्मचारम्य़ांना विचारणा करताना दिसत होते. पत्नी मुलांची नावे एका केंद्रात आणि पतीचे दुसरम्य़ा केंद्रात नाव असाही प्रकार घडल्याने मतदार त्रासले होते. नवमतदारांना मतदानासाठी आल्यानंतरच ओळखपत्र देण्यात येत होते.

अपंग मतदारांसाठी सुविधा

मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय, अंध तथा दुर्बल मतदारांसोबत सहकारम्य़ास परवानगी, विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य, ब्रेल लिपीची सुविधा, पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मतदान केंद्रांमध्ये प्रत्येक पुरुष मतदारामागे दोन महिला मतदारांना प्रवेश देण्याची सुविधा होती. वृद्ध, दिव्यांग मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी व्हील चेअर आणि कर्मचारी तैनात होते. वृद्ध, दिव्यांग मतदारास थेट मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

नवमतदारांचे स्वागत

प्रशासनाने नवमतदारांचे स्वागत वेगवेगळ्या प्रकारे केले. काही गावांमध्ये नवमतदारान फेटे बांधून केंद्रात नेण्यात आले. तर, काही गावांत गुलाबपुष्प, रोपटे देऊ न स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या या उपR मांना तरुणाईने दाद दिली.

मतदानाची टक्केवारी कशीबशी गाठली ; पुण्यात ५२ तर बारामतीत ६१ टक्के मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात मतदानाची सरासरी मंगळवारी कशीबशी गाठली गेली. पुण्यात ५२ टक्के मतदान झाले, तर बारामतीमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन ते ६१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यात ५४.१४ तर बारामतीमध्ये ५८.८३ टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रियेनंतर भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. पुण्यात मतदान सरासरीपर्यंत राहिल्यामुळे आणि बारामतीमधील मतदान वाढल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यंदा जिल्हा निवडणूक शाखेकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र मतदारांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. जिल्हा निवडणूक शाखेने केलेल्या तयारीमुळे मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी अपवादानाचे आल्या, हे या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरले.

शासकीय यंत्रणेकडून मतदानापूर्वी घरोघरी वाटप होणाऱ्या स्लिपांचे मतदान केंद्रांवरच वितरण करण्यात आले. त्यामुळे स्लिप घेण्यासाठी केंद्रांबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्रही दिसून आले. निवडणुकीत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन स्लिपांचे वाटप करण्यात येते. यंदा कार्यकर्त्यांना स्लिपा वाटपास मनाई करण्यात आली होती. शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेचा फटका मतदानाला काही प्रमाणात बसला. भाजपने मतदानाच्या आदल्या दिवसापासून पैशांचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला. बापट यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. त्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला त्यांनी हाताशी धरले. काँग्रेसची व्होट बँक असलेल्या भागात हा प्रकार झाल्याचा आरोप जोशी यांनी केला. बापट यांनी मात्र हे आरोप फेटाळले. निवडणूक प्रक्रियेतील एकाही अधिकाऱ्याशी मी कधीच संपर्क साधलेला नाही. भीतीपोटीच असे आरोप होत आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुण्यातील मतदान

सन २०१४- ५४.१४ टक्के

सन २०१९- ५२ टक्के

बारामतीमधील मतदान

सन २०१४- ५८.८३ टक्के

सन २०१९- ६१ टक्के

औरंगाबाद मतदारसंघात ६१.८७ टक्के मतदान

एका गावाचा मतदानावर बहिष्कार, दोन किरकोळ गुन्हे दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मंगळवारी अंदाजे ६१.८७ टक्के मतदारांनी मतदान केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. सर्वत्र मतदान शांततेत झाले. वैजापूर तालुक्यातील शरीफपूर गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानादरम्यान मतदान यंत्रावर ठराविक उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर दिसून आल्याने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानापूर्वी वैजापूर येथे सोमवारी रात्री ५० हजार रुपयांची रोकड मतदारांना देताना काही कार्यकर्ते आढळून आले. ते शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे कार्यकर्ते होते, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेनेसाठी सोपी वाटणारी ही निवडणूक अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे ही लढत अधिक चुरशीची बनली. पाचव्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उभे असणारे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आव्हान उभे केले होते. प्रचारादरम्यान या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला. ग्रामीण आणि शहरी भागात आज सकाळी सात वाजता बहुतांश ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली. मतदानापूर्वी केलेल्या चाचणीदरम्यान २४ बॅलेट युनिट, १७ कंट्रोल युनिट आणि ११ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी १० बॅलेट युनिट, पाच कंट्रोल युनिट व सात व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या. मशीन बदलण्याचे हे प्रमाण एकूण मतदान यंत्राच्या केवळ ०.७५ टक्के होते, असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. व्हीव्हीपॅटवर मतदारांनी कोणत्या उमेदवारावर मतदान केले आहे, हे सात सेकंद दिसते. तर त्याची पावती व्हीव्हीपॅटमध्ये आणखी काही कालावधी जातो. त्यामुळे दुपारच्या कालावधीत मतदानाचा कमी झालेला वेग वाढविण्यासाठी ९० अधिकाऱ्यांना पुन्हा विशेष नियुक्ती देण्यात आली होती. औरंगाबाद मतदारसंघात सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आल्या होत्या. वैजापूर तालुक्यातील शरीफपूर हे गाव गंगापूर विधानसभा मतदारसंघात येते. या गावच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दुपापर्यंत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी गावकऱ्यांशी चर्चा करत होते. मात्र, त्यांनी बहिष्काराचा निर्णय कायम ठेवला. मतदानानंतर मतदान यंत्र औरंगाबाद शहरातील स्ट्राँगरूममध्ये आणल्या जात आहेत. उद्या मतदान केंद्राच्या कागदपत्रांची निवडणूक निरीक्षक छाननी करणार आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक ६३ टक्के मतदान झाले असून पश्चिममध्ये ६२ टक्के, पूर्वमध्ये ५९ टक्के मतदान झाले. तर जिल्ह्य़ातील तीन ग्रामीण मतदारसंघात कन्नड व गंगापूरमध्ये ६३ टक्के तर वैजापूरमध्ये ६१ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेसहापर्यंत काही मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या. पण त्या फार मोठय़ा नाहीत. त्यामुळे फार उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार नाही. नव्याने तीन लाखांहून अधिक मतदार वाढल्यानंतरही मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१४ साली औरंगाबाद मतदारसंघात ५९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ते ६२ टक्क्य़ांहून अधिक होईल, असा अंदाज आहे.

जालना मतदार संघात ६५ टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान

जालना : तापमान ३८ अंश असूनही जालना लोकसभा मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ९ लाख २१ हजार मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी ६०.२९ एवढी होती. या मतदार संघात ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मतदान जागृतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. ग्रामीण भागात मतदानात उत्साह दिसून आला. परंतु त्या तुलनेत शहरी भागामध्ये मतदानाचे प्रमाण कमी राहिले. या लोकसभा मतदार संघातील जालना विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार आणि सर्वाधिक शहरी मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्य़ाचे ठिकाण असलेल्या जालना विधानसभा क्षेत्रातील २२७ मतदान केंद्रे शहरात असून १०४ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. परंतु लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी जालना विधानसभा क्षेत्रात दुपारी तीनपर्यंत सर्वात कमी मतदान झाले होते. लोकसभा मतदार संघातील मतदानाची सरासरी ४९.३९ टक्के होती. परंतु मोठय़ा प्रमाणावर शहरी भाग असलेल्या जालना विधानसभा क्षेत्रात मतदानाचे प्रमाण मात्र ४१.५५ टक्के एवढे होते.

सकाळी सात ते आठ दरम्यानच्या दोन तासांत सरासरी ९.२३ टक्के मतदान झाले. मोठा शहरी भाग असलेल्या जालना विधानसभा क्षेत्रात या दोन तासांत मतदान संथगतीने म्हणजे ७.७७ टक्के एवढेच झाले. या दोन तासांत विधानसभा मतदार संघनिहाय विचार केला तर बदनापूर (९.९० टक्के), भोकरदन (१०.८८ टक्के) आणि पैठण (९.३६ टक्के) याप्रमाणे मतदानाचे प्रमाण होते. मतदान सुरू झाल्यानंतरच्या दोन तासांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण एकूण मतदानात ५.३४ टक्के होते.

नंतरच्या दोन तासांत म्हणजे ११ वाजेपर्यंत मात्र महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढली. ११ वाजेपर्यंत महिलांचे मतदान १८.४३ टक्क्य़ांनी वाढले. तर पुरुष मतदानात २७.६७ टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली. पहिल्या चार तासांत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे गाव असणाऱ्या भोकरदन विधानसभा क्षेत्रात मतदानाची गती अधिक होती. सात ते ११ दरम्यान भोकरदनमध्ये एकूण चार लाख ३५ हजार १४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये दोन लाख ७३ हजार ५५८ पुरुषांचा तर एक लाख ६१ हजार ५८७ महिलांचा समावेश होता. ११ वाजेपर्यंत बदनापूर-२४.६१ टक्के, भोकरदन-२५.३३ टक्के आणि पैठण २४.३९ टक्के याप्रमाणे मतदानाचे प्रमाण होते. दुपारी एकपर्यंत मतदानाची टक्केवारी ३७.८५ टक्के तर तीन वाजेपर्यंत ४९.२४ टक्के झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ लाख २१ हजार १९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जालना शहर आणि परिसरात १५ मतदान केंद्रांवर ‘वोटर सेल्फी पॉइंट’ व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी मतदान केल्यानंतर मतदारांनी सेल्फी फोटो काढले. मतदार संघातील ३९ संवेदनशील केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते. १६२ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर होती. प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पोलचिट’चा पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य़ धरले जाणार असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केले होते. परंतु जालना शहरातील कसबा भागातील २३३ क्रमांकाच्या केंद्रावर प्रशासनाची छायाचित्रांसह पोलचिट असणाऱ्या एका मतदाराने तोच पुरावा ओळख म्हणून ग्राह्य़ धरण्याचा आग्रह धरला. परंतु मतदान केंद्राध्यक्षांनी त्यास नकार दिला. अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे बाळासाहेब धोंडिबा उबाळे याने ईव्हीएमवर मतदान करताना छायाचित्र काढले आणि मतदान केंद्राच्या बाहेर येऊन इतरांना दाखविले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मोबाइल जप्त केला. भाजपचे दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात प्रमुख लढत असलेल्या जालना मतदार संघात ऐन उन्हाच्या वेळी म्हणजे दुपारी ११ ते १ दरम्यानच्या दोन तासांत सर्वाधिक १४.५२ टक्के मतदान झाले.

नगरमध्ये सुमारे ६५ टक्के मतदान

नगर : नगर मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रात्री वर्तवला अद्याप सर्व मतदानकेंद्रावरील टक्केवारीची माहिती संकलित झालेली नसून ती हाती आल्यानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक विभागाकडे सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार ५६.९७ टक्के मतदान झाले. शेवगाव विधानसभा मतदारसंघात ५८.१९ टक्के, राहुरीत ५७.५१ टक्के, पारनेरमध्ये ५८.०४ टक्के, नगर शहरात ५४.२९ टक्के, श्रीगोंद्यात ५५.९२ टक्के, कर्जत-जामखेडमध्ये ५७.५७ टक्के असे एकूण सरासरी ५६.९७ टक्के मतदान सायंकाळी पाच पर्यंत झाले होते.

 

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदान

देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सरासरी ६४.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात एकाचा मृत्यू, ठिकठिकाणी मतदानयंत्रांत बिघाड झाल्याच्या तक्रारी आदी अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.

तिसऱ्या टप्प्यात गुजरात आणि केरळमधील सर्व मतदारसंघांसह ११६ जागांसाठी मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ आसाममध्ये ७८.२९ टक्के, बिहार ६०, गोवा ७१.०९, गुजरात ६०.२१, जम्मू-काश्मीर १२.८६, कर्नाटक ६४.१४, केरळ ७०.२१, ओदिशा ५८.१८, त्रिपुरा ७८.५२, उत्तर प्रदेश ६०, छत्तीसगड ६५.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी, त्यांनी गांधीनगरमध्ये जाऊन मातोश्रींची भेट घेतली. गांधीनगर मतदारसंघातून भाजप अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत. तिसऱ्या टप्प्यात शहा यांच्यासह सप नेते मुलायमसिंह यादव, भाजपचे वरूण गांधी, भाजपच्या जयाप्रदा आदींचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले. गेल्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात ९१ तर १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात ९५ जागांसाठी मतदान झाले होते.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी

मतदान                   टक्केवारी

रायगड                      ५६.१४

रत्नागिरी-सिंधुदुर्ग     ५७.६३

जळगाव                     ५२.२८

रावेर                           ५६.९८

जालना                     ५९.९२

औरंगाबाद                ५८.५२

अहमदनगर             ५७.७५

पुणे                          ४३.६३

बारामती                  ५५.८४

माढा                        ५६.४१

सांगली                    ५९.३९

सातारा                     ५५.४०

कोल्हापूर                 ६५.७०

हातकणंगले             ६४.७९