देशभरात आजपासून १७ व्या लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सात टप्प्यांमध्ये होणारा या मतदानामधील पहिल्या टप्प्यात आज देशभरातील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. जम्मू-काश्मीरमधील जम्मू आणि बारामुल्ला या दोन मतदारसंघाचाही पहिल्या टप्प्यात समावेश असून तेथेही आज सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान नॅशनल काँन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन पूंछ भागातील ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे.

‘पूंछमधील मतदान केंद्रांमध्ये काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही. ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे,’ असं ट्विट अब्दुल्ला यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक अधिकारीच इव्हीएम मशीनच्या बटण दाबले जात नसल्याचं सांगताना दिसत आहे.

पूंछमध्ये ही स्थिती असतानाचा दुसरीकडे दक्षिण भारतात आंध्रप्रदेशमध्येही १०० हून अधिक ईव्हीएम मशीन खराब झाल्याने काही मतदानकेंद्रांमध्ये मतदान थांबवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून ईव्हीएम मशीन्समधील तांत्रिक अडचणींसंदर्भातील तक्रारी समोर येत आहेत.

दरम्यान आजच्या पहिल्या टप्प्यामधील मतदानामध्ये महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघामध्येही मतदान होत आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये आज सकाळपासूनच मतदान सुरु झाले आहे. नितीन गडकरी, हंसराज अहीर, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या दिग्गज नेत्यांच भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यातील सात जागांव्यतिरीक्त आज पहिल्या टप्प्यात मेघालय, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा जागांवर मतदान होत आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशमधील आठ, आसाम आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सात, बिहार आणि ओडिशामधील प्रत्येकी चार तर पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमधील प्रत्येक दोन जागांवर मतदान सुरु आहे.