लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडला, असे म्हणता येणार नाही.  मी १० वर्षे काँग्रेसची नि:स्वार्थीपणे सेवा केली. आता मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईकर असल्याने मला शिवसेनेबाबत पूर्वीपासून आत्मियता वाटत आली आहे, असे प्रियांका चतुर्वेदींनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मला होणारा त्रास मी काँग्रेस पक्ष नेतृत्वाला कळवला होता. ज्यांनी मला त्रास दिला त्यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा पक्षात घेतले याचा मला जास्त त्रास झाला, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मी अत्यंत विचारपूर्वक शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबई माझी कर्मभूमी आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करताना मी मुंबईपासून दुरावले होते. मला मुंबईत परतायचे होते आणि अशा स्थितीत शिवसेना हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे चतुर्वेदी यांनी नमूद केले.

मी मूळची मुंबईकर असल्याने लहानपणापासूनच शिवसेनेबाबत आत्मियता आहे. त्यामुळे मला मनपरिवर्तन करण्याची गरज पडली नाही. मला शिवसेनेकडून कोणतीही अपेक्षा नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर माझ्यावर पुन्हा टीका केली जाईल. मी भूतकाळात केलेली टीका बाहेर काढली जाईल, पण मी विचारपूर्वक शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे चतुर्वेदींनी म्हटले आहे. मी मथुरातून तिकीट मागितले नव्हते, मथुरा हे माझ्या आई – वडिलांचे गाव आहे. त्या शहराशी माझे  भावनिक नाते आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मी प्रियांका यांचे शिवसेनेत स्वागत करतो. प्रियांका यांनी पूर्वीच्या पक्षाची भूमिका मजबुतीने मांडली होती, आता त्या शिवसेनेची भूमिकाही तितक्याच मजबुतीने मांडतील. एक चांगली बहिण शिवसैनिकांना मिळाली असून प्रियांका या लढवय्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.