पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टिकेला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मनमोहन सिंग हे देशातील जनतेचे पंतप्रधान होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा केलेला अपमान हा देशातील जनतेचा अपमान आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले. ‘दुसऱ्या पंतप्रधानांबद्दल अनादराने बोलणारे मोदी देशाचे पहिले पंतप्रधान असावेत. त्यांनी आदराने बोलणे शिकायला हवे,’ अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.

‘मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी जेव्हा मनमोहन सिंग यांच्याविषयी बोलतात, तेव्हा ते संपूर्ण देशाविषयी बोलतात. पंतप्रधान मोदींची एक समस्या आहे. त्यांना कायम बातम्यांमध्ये झळकायला आवडते. ज्या दिवशी मोदी बातम्यांमध्ये नसतील, तेव्हा त्यांना झोप येत नसेल,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. ‘उत्तराखंडमध्ये भूकंप झाला. मात्र फक्त प्रसिद्धीसाठी पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाचा संसदेत बोलताना विनोदाने उल्लेख केला,’ असे राहुल गांधी उत्तराखंडमधील जाहीर सभेत म्हणाले.

‘नरेंद्र मोदींनी पूर्ण बहुमत देण्यास सांगितले होते. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. नरेंद्र मोदींनी लोकांना अनेक आश्वासने दिली. मोदीजी, तुम्ही २ कोटी रोजगार देणार होतात. तरुणांना रोजगार मिळाले नाहीत. मेक इंडियाचेदेखील पुढे काहीच झाले नाही. पंतप्रधान मोदी फक्त बोलून दाखवतात. त्यातही जेव्हा तुम्ही मनमोहन सिंग यांच्याविषयी बोलतात, तेव्हा तुम्हाला साधा आदरदेखील दाखवता येत नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

बुधवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. ‘स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांपैकी ३५ वर्षे मनमोहन सिंग देशाच्या आर्थिक व्यवस्था आणि त्यासंबंधीचे निर्णय यांचा महत्त्वपूर्ण भाग होते. मात्र इतके वर्षे निर्णय व्यवस्थेचा भाग असूनही मनमोहन सिंग यांच्यावर एकही आरोप झाला नाही. आजूबाजूला भ्रष्टाचार होत असताना मनमोहन सिंग मात्र स्वच्छ होते. बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला हवी,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती.