शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा प्रचारासाठी चालतो तर मग शहीदांच्या मृत्यूचा मुद्दा प्रचारासाठी का चालत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केलेल्या या विधानाचा राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये समाचार घेतला होता. राज ठाकरेंची टीका खोडून काढताना मुंबई भाजपाचे प्रमुख आशिष शेलार यांनी राज यांच्यावर पलटवार केला आहे. शहिदांबाबत मोदींच्या मुलाखतीचा व्हीडिओ राज ठाकरेंनी अर्धवट दाखवला असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जर या व्हीडिओतील मुद्दा दाखवायचाच होता तर संपूर्ण दाखवायचा होता असा टोलाही त्यांनी लगावला.

आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना त्यांच्या स्टाईलनेच उत्तर दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या जहरी टीकेचे व्हीडिओ तसेच मोदी-शहांवर केलेल्या आरोपांचे व्हीडिओ दाखवत राज यांना उत्तरे दिली. शेलार म्हणाले, मोदींच्या मुलाखतीतीतल शहीदांबाबतचे वक्तव्य हे राज यांनी अर्धवट कापून दाखवले. मोदींचं हे विधान दाखवायचंच होत तर पूर्ण विधान दाखवायचं होतं. खरं काय ते जनतेसमोर आलं असतं.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर महिलांवरील बालात्कारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केला होता. मोदींच्या काळात ३८ हजार बलात्कार झाले असा आरोप राज यांनी केला होता. या आरोपांनाही शेलार यांनी उत्तर दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या विधासभेतील माहितीचा व्हीडिओ शेलार यांनी दाखवला. मोदी सरकारच्या काळात महिला अत्याचारांबाबत केवळ विनयभंगांबाबत ३ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींकडून ८८.८१ आणि अनोळखी व्यक्तींकडून झालेल्या महिला अत्याचारांचे प्रमाण १ टक्का असल्याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली होती. याचा व्हीडिओही त्यांनी यावेळी दाखवला. उलट २०१३ मध्ये बलात्कारासंबंधी कायद्यात बदल केल्याने या कायद्याची व्याप्ती वाढली आणि तो अधिक कठोर बनला. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी वाढल्याचे शेलार म्हणाले. ओळखीच्या व्यक्तीविरोधात तक्रार करण्यात महिला पुढे येत आहेत, ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. महिलेवर अत्याचार होऊ नयेत तीच संरक्षण करणं आपल काम आहे. मात्र, त्यावर राजकारण करणं ही हीनता आहे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली.