२०१४ च्या निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला अशी बोंब सगळ्यांनी उठवली होती. अमित शाह सांगलीत म्हणाले होते की ७२ हजार कोटींच्या घोटाळ्यात काय झालं? असं विचारत होते. मी असं विचारतो की मागील साडेचार वर्षात सिंचन घोटाळाप्रकरणी कुणालाही अटक का झाली नाही? अजित पवार आणि सुनील तटकरे यांची नावं या घोटाळ्यात पुढे आली होती. त्यांच्यावर या सरकारने कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच सिंचन घोटाळा झाला की त्याचंही तुम्ही राजकारण केलंत असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. नाशिकच्या सभेत त्यांनी ही टीका केली.

नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणाले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पलीकडे काय दिलं? कांदा एक रुपये किलोवर येऊन थांबतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी कसं जगायचं?दत्तक घेतो म्हणणारे मुख्यमंत्री पळून जातात अशीही टीका राज ठाकरेंनी केली. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही राज ठाकरेंनी टीका केली. भाजपा सेनेच्या काळात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याच शेतकऱ्यांबाबत भाजपाचे नेते उद्धटपणे बोलत आहेत हे सांगताना विविध नेत्यांची वक्तव्यं राज ठाकरेंनी वाचून दाखवली आणि या भाजपाचा सत्तेचा माज उतरवा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं.

याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका आला आणि त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे साडेचार कोटी लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीचा निर्णय कुणालाही कल्पना न देता एकट्या मोदींनी जाहीर केला आणि देशाला वेठीला धरलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली ती वाहिन्यांवर दाखवण्यातच आली नाही. नोटाबंदीच्या माध्यमातून देशाला मूर्ख बनवण्याचा प्रकार मोदींनी केला असाही आरोप राज ठाकरेंनी केला.