पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे वाटत असेल की ते अजिंक्य आहेत तर तो त्यांचा गैरसमज आहे. २००४ मध्ये वाजपेयींनाही असेच वाटत होते की ते अजिंक्य आहेत मात्र आम्हीच निवडून आलो असे सांगत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. आज सोनिया गांधी यांनी रायबरेलीमध्ये शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही होते.

राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारताच्या राजकारणात असे अनेक लोक आहेत जे स्वतःला अजिंक्य समजतात. त्यांना असे वाटते की ते देशापेक्षा मोठे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशासाठी काहीही केले नाही. पाच वर्षात त्यांनी एकाही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्यांने जे वाटते आहे की मी अजिंक्य आहे तर तो त्यांचा गैरसमज ठरणार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निकालाच्या दिवशी देशातलं चित्र बदललेलं असेल असाही विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतं आहे. अशात आज सोनिया गांधी यांनी जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींना खडे बोल सुनावले. २००४ मध्ये काय घडलं ते मोदींनी विसरू नये असे त्या म्हटल्या आहेत. आता या टीकेला मोदी काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.