लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाकडे देशवाशियांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुचीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. “जे अभ्यास करत नाहीत, त्यांना पेपर अवघड जातो. पण मला पेपर कठीण जात नाही, अशू प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे दहा वर्षे खासदार असलेले विनायक राऊत यंदाही हॅटट्रिक करणार का? की नारायण राणे बाजी मारणार हे आता ४ जूनला स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्हीही उमेदवारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा : “इंडिया आघाडीचं सरकार येणं अशक्य”, म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले..

नारायण राणे काय म्हणाले?

नारायण राणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते म्हणाले, “मी नेहमीच परीक्षेला बसतो, त्यामुळे मला पेपर सोपा वाटतो. मी अभ्यास करून पेपरला बसतो. जे अभ्यास करत नसतात त्यांना पेपर अवघड जाणार, पण मला पेपर कठीण जात नाही”, असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, “रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की, या निवडणुकीत मी उमेदवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारची घोषणा केलेली आहे. देशात ४०० खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत. यामध्ये कोकणातील जनतेने एवढ्या वर्ष मला प्रेम दिले आहे. आता आपल्या मतदारसंघाचा विकास व्होण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, ही मतदारांना विनंती आहे”, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ११ मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.