राज्यात सत्तेत आल्यास कमी किमतीत मद्यविक्री करण्याचे आश्वासन आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने दिले आहे. या श्वासनाद्वारे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर राज्यातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न टीडीपीकडून करण्यात आला आहे. त्यांच्या या आश्वासनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू हे कुप्पममधील लोकसभेचे उमेदवार आहेत. नुकताच कुप्पममध्ये त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत आल्यास चांगल्या दर्जाचे मद्य कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी त्यांनी मद्यबंदीच्या आश्वासनावरून जगन मोहन रेड्डी यांनाही लक्ष्य केलं.

हेही वाचा – “तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाले चंद्रबाबू नायडू?

राज्यातील मद्याच्या किंमती कमी व्हाव्यात, अशी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तेलुगू देसम पक्षाचे सरकार आल्यास आम्ही ४० दिवसांनंतर जनतेला उत्तम दर्जाचे मद्य कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ. ही आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रबाबू नायडू यांनी दिली. देशात सध्या सर्वच वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यात मद्याचे दरही वाढले आहेत. मी मद्याचे नाव काढताच काही लोक जल्लोष करत आहेत. याचा अर्थ मद्याचे दर कमी व्हावे, अशी या लोकांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी मद्यबंदीच्या मुद्द्यावरून जगन मोहन रेड्डी यांनाही लक्ष्य केलं. जगन मोहन रेड्डी यांनी २०१९ मध्ये मद्यबंदीचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांत या आश्वासनावरून त्यांनी माघार घेतली. त्यांच्या सरकारने मद्याची किंमत ६० रुपयांवरून २०० रुपयांपर्यंत वाढवली. तसेच १०० रुपये स्वत:च्या खिशात घातले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – “हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या सरकारने मद्यविक्रीतून जवळपास २४ हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. महत्त्वाचे म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वीच वायएसआर काँग्रेसच्या सरकारने राज्यात निकृष्ट दर्जाचा मद्यपुरवठा केल्याचा आरोप केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनीही सरकारकडून राज्यात निकृष्ट दर्जाचा मद्यपुरवठा होत असल्याचा आरोप केला होता. राज्यात निकृष्ट दर्जाचा दारुपुरवठा सुरू राहिल्यास, राज्यातील जनता मोठ्या प्रमाणात आजारी पडेल, असेही ते म्हणाले होते.