वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांना गृहकलह भेडसावत आहे. पुत्र पंकज आणि विभक्त सून पूजा यांच्यातील सांसारिक कलह चव्हाट्यावर आल्याने रामदास तडस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, रामदास तडस यांच्याविरोधात आता पूजा तडसही निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार आहेत, मिड डे ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांची सून पूजा शेंद्रे तडस (३२) यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी रामदास तडस यांच्यासाठी सभाही घेतली होती. या सभेआधीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा भांडाफोड केला होता.

हेही वाचा >> ‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा

पूजा यांच्यावर पंकज यांनी अत्याचार केले. पूजा यांना एका खोलीत डांबून ठेवलं. पंकज यांच्यापासून पूजाला मुलगा झाल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्यास सांगितले, अशा अनेकप्रकारचे आरोप रामदास तडस यांच्यावर करण्यात आले आहेत. तसंच, पूजा यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या सतरा महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा >> “सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरले – पूजा तडस

रामदास तडस यांचा मुलगा व माझे पती पंकजने लग्नानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन ठेवले, मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आले. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. खासदार रामदास तडस आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी कर. खासदार तडस म्हणतात, मी मुलाला बेदखल केले. पण मुलाला घरातून काढले नाही, मग मला एकटीलाच का काढले? माझ्याशी राजकारण कशाला करता? मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे. मात्र, ती न्यायालयाच्या माध्यमातून करा. मला दोन वेळचे अन्नही दिले जात नाही. तडस कुटुंबीयांनी मला न्याय दिला नाही. म्हणून मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, असे पूजा तडस म्हणाल्या.