राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांची भेट झाली. यावेळी हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडले. रामनवमीनिमित्त दोन्ही नेते नाशिकच्या काळाराम मंदिरात समोरासमोर आले. त्यावेळी छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट झाली. महायुतीत असलेले हो दोन्ही नेते नाशिकमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. अशात ही भेट आणि हेमंत गोडसेंनी भुजबळांना नमस्कार करणं सूचक मानलं जातं आहे. आता नाशिकमधून लोकसभेचं तिकिट कुणाला मिळणार याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

नाशिकच्या काळाराम मंदिरात भेट

नाशिकच्या काळाराम मंदिरात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट झाली तेव्हा भुजबळांना समोर पाहताच हेमंत गोडसेंनी त्यांना वाकून नमस्कार केला. रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात दर्शन घेऊन निघाले होते. त्यावेळी या दोन नेत्यांची भेट झाली. छगन भुजबळांच्या पाया पाडून हेमंत गोडसेंनी आशीर्वाद घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेमंत गोडसेंनी काय म्हटलं आहे?

छगन भुजबळांच्या पाया पडल्यानंतर हेमंत गोडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. “मराठी संस्कृतीत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. आज प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर मला छगन भुजबळ भेटले. त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद घेतले. मी छगन भुजबळांचे आशीर्वाद का घेतले ते प्रभू रामचंद्रांना माहीत आहे. उमेदवारीची संधी मिळावी म्हणून रामरायाकडे प्रार्थना केली असंही गोडसे यांनी म्हटलं आहे. एक ते दोन दिवसांत नाशिकचा निर्णय जाहीर होईल. मी दहा वर्षे खासदार आहे त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा धनुष्यबाणच येईल असंही गोडसेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितली आहे. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जागा मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेवर दबाव दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी, यासाठी इतर दोघांवर दबाव यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहिला मिळतो आहे.