पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना उद्देशून बोलत असताना त्यांचा ‘अस्वस्थ आत्मा’ असा उल्लेख केला होता. यावरून मोदी विरुद्ध पवार असा सामना ऐन निवडणुकीच्या प्रचारात रंगला आहे. आज कोल्हापूर येथे शरद पवार प्रचारासाठी आले असताना त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी नुकतेच कोल्हापूरमध्ये केलेल्या भाषणाची नक्कल करत त्यांच्यावर निशाणा साधला. “मोदी कोल्हापूरला आले आणि भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले ‘नमस्कार कोल्हापूरकर’. जाईल तिथं मोदी स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली वाक्य बोलत असतात. स्थानिक भाषेत बोलून भाषणाला सुरुवात करणं ही त्यांची स्टाईल आहे”, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या भाषणाच्या सुरुवातीची नक्कल करून दाखविली.

कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख विसरले

शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा उल्लेख करतात. पण कराडमध्ये त्यांना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा विसर पडला. कारण स्थानिक नेत्यांनीच त्यांना तसे लिहून दिले नाही. कारण भाजपाचे स्थानिक नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत कितपत आस्था ठेवतात? हा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी कराडमध्ये सातारचा उल्लेख केला पण कराडचा उल्लेख केला नाही.

धर्मावर आरक्षण आम्हाला मान्य नाही

काँग्रेस सत्तेत आल्यास ते धर्मावर आरक्षण देतील, असा आरोप पंतप्रधान मोदी आपल्या संभामधून करत आहेत. यावर शरद पवार यांची भूमिका विचारली असता ते म्हणाले, “धर्मावर आरक्षण ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही. हे कुणीही करणार नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले तरी आम्ही त्या विरोधात उभे राहू. मोदींचे विधान सामाजिक तणाव आणि कटुता वाढविणारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचेच नाही.”

तसेच पंतप्रधान हा देशाचा असतो. तो उत्तर, दक्षिण असा नसतो. पण सध्या वेडेपणा सुरू आहे. दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद योग्य नाही. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी असा वाद निर्माण केलेला नाही. पण दक्षिणेतील राज्यांबाबत संभ्रम निर्माण करून आपल्याला उत्तरेकडील राज्यामध्ये अधिक पाठिंबा मिळेल, असा प्रयत्न यातून दिसत आहे. पण लोक मुळीच हे मान्य करणार नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच पंतप्रधान होणार, हा जावई शोध

इंडिया आघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक वर्षी एक असे पाच वर्षाला पाच पंतप्रधान देशाला मिळतील, असा उल्लेख पंतप्रधान मोदी आपल्या जाहीर सभांमधून करत आहेत. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “हा जावई शोध कुणी लावला? इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये आम्ही अधिक जागा मागितल्या नाहीत. आमचा एकच उद्देश आहे भाजपाचा पराभव करणे. पंतप्रधान कोण असणार? याची चर्चा झाली नाही आणि निवडणुकीपूर्वी करणे योग्यही नाही.” शरद पवार यांनी आणीबाणीनंतरच्या निवडणुकीचे उदाहरण देताना सांगितले की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाने पंतप्रधान ठरविला.