Sanjay Raut : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला अशी माहिती काही वेळापूर्वी व्हायरल झाली होती. ज्याबाबत विजय वडेट्टीवार यांनीही स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर या पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. भाजपाशी हातमिळवणी करण्याबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
नेमक्या काय चर्चा झाल्या?
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राकडे एक महिनाही उरलेला नाही. अशातच सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी समोर आली जी काँग्रेसकडूनच आल्याचं सांगण्यात आलं. ही बातमी अशी होती की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे तसंच संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला, काँग्रेस हायकमांडशी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी ही चर्चा केली अशी माहिती समोर आली. एवढंच नाही तर वाऱ्यासारखी व्हायरलही झाली. महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल पासून उद्धव ठाकरे महायुतीत येणार का? इथपर्यंतच्या चर्चा झाल्या. याबाबत आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप बाकी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही बातमी आल्यानंतर प्रचंड चर्चा झाली कारण २०१९ मध्ये जी युती मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यामुळे तुटली त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारणच बदललं. अजूनही महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोडं गंगेन न्हालेलं नाही. काँग्रेस नेत्यांकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना हव्या त्या जागा मिळत नाहीत अशी चर्चा आहे. तसंच जागावाटपावरुन नाना पटोलेंची भूमिकाही अनेकांना मान्य नाही. त्यामुळे शिवसेना ( उद्धव ठाकरे) ( Uddhav Thackeray ) आणि काँग्रेस यांच्यातून विस्तव जात नाही अशा चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची आणि संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) अमित शाह यांना फोन केल्याची चर्चा रंगली. विशेष बाब म्हणजे ही बातमी काँग्रेसच्या सूत्रांनी दिल्याचंही समोर आलं होतं. याबाबत आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
काय म्हणाले संजय राऊत?
“संजय राऊतांची ( Sanjay Raut ) अमित शाह यांच्याशी भेट झाली हे सांगितलं जातंय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटतं आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले
भाजपाशी हातमिळवणी म्हणजे औरंगजेब किंवा अफझल खानाशी हात मिळवणी
स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. अशा अफवा पसरवून कोणी लढणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. कोणी सुपाऱ्या दिल्या याची बातमी आमच्याकडे आली आहे. आमचीही यंत्रणा आहे. एक वेगळं पेगासेस आमच्याकडे सुद्धा आहे. कोण कोणाकडून अफवा पसरवून घेतय, हे आमच्याकडे आहेत. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारांशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपशी हात मिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाशी हात मिळवणी करणे. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.