धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी केलेल्या एका विधानावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खोचक शब्दात टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. “किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका, म्हणजे रात्रीतून कोणत्याही पक्षात जायला मोकळे”, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी मारला आहे.

हेही वाचा : “डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

मल्हार पाटील काय म्हणाले होते?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने २०१९ मध्ये आम्ही राष्ट्रवादीसोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो की, त्यांनी आम्हाला आधी पाठवले आणि नंतर तेही भाजपाबरोबर आले. त्यामुळे तुम्ही आमची चिंता करु नका. आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचे काम, पूर्ण ताकदीने आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही”, असे मल्हार पाटील यांनी एका सभेत बोलताना म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

“तुमच्या रक्तात राष्ट्रावादी, हृदयामध्ये भाजपा आहे. मी म्हणतो आता किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका. शरीराच्या सर्व पार्टमध्ये सगळे पक्ष गेले की रात्रीतून कोणत्याही पक्षात जायला मोकळे, काय समर्थन करत आहेत? लोकांना जर अशा पद्धतीने गृहीत धरुन चालले तर या गद्दारांना त्यांची जागा दाखवतील”, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.