कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती यश मिळवलं आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्रीपदाचे दोन मोठे दावेदार आहेत. पहिले आहेत सिद्धरामय्या आणि दुसरे आहेत डी. के. शिवकुमार. या दोघांनीही आज राहुल गांधींची भेट घेतली आहे. या दोघांच्या रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. अशात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धरामय्याच पुढचे मुख्यमंत्री असतील अशाही बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जात आहेत. मात्र काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

काय म्हटलं आहे सुरजेवाला यांनी?

“कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पुढच्या ४८ तासांमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची याबाबत आमची चर्चा सुरु आहे.” या आशयाचं वक्तव्य रणदीप सुरजेवालांनी केलं आहे. तसंच भाजपावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “भाजपाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. आता ते वैफल्यग्रस्त अवस्थेतून विविध खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत. त्याकडे मुळीच लक्ष देऊ नका.”

आणखी काय म्हणाले सुरजेवाला?

कर्नाटकच्या सत्तास्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय होईल. त्यानंतर एकदा सरकार स्थापन झालं की पुढच्या ४८ ते ७२ तासांमध्ये कॅबिनेटची बैठक होईल. असंही सुरजेवालांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धरामय्या आणि डीके राहुल गांधींच्या भेटीला

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतल्यानंतर आज डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांनीही राहुल गांधींची भेट घेतली. या दोघांनीही राहुल गांधींची वेगवेगळी भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांची राहुल गांधींसह सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतं आहे. सिद्धरामय्यांनी सुमारे ३० मिनिटं राहुल गांधींसह चर्चा केली. तर डी. के. शिवकुमार हे तासभर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत होते. या भेटीनंतर शिवकुमार हे पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला गेले होते.