उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळेच हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी भाजपा नेते स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. या प्रसंगी ‘व्हर्च्युअल रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने, लखनऊ पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या रॅलीला सपा प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपाचे माजी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर जोरदार टीका होऊ लागली. कोविड-१९ प्रकरणांमध्ये नव्याने वाढ झाल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. यामुळेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यूपी पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.

समाजवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या प्रचंड मेळाव्याच्या संदर्भात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि महामारी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौतम पल्ली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. लखनऊ जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रथमदर्शनी, कोविड-19 नियमांचे उल्लंघन झाले आहे आणि तपास सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तेथे गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लखनऊच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी यापूर्वीच समाजवादी पक्षाची रॅली विनापरवाना होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांचे पथक समाजवादी पार्टीच्या कार्यालयात पाठवून याप्रकरणी आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणावर समाजवादी पार्टीचे यूपी प्रमुख नरेश उत्तम पटेल म्हणाले- “आमच्या पक्ष कार्यालयात ही व्हर्च्युअल रॅली होती. आम्ही कोणालाही आमंत्रित केले नाही परंतु लोक आले. लोक करोना प्रोटोकॉलचे पालन करून काम करत आहेत. भाजपाच्या मंत्र्यांच्या घरी आणि बाजारपेठेतही गर्दी असते, पण त्यांना आमचीच अडचण आहे.”