एकाहून अधिक बँकेमध्ये तुमचे बचत खाते असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. तुमची एकाहून अधिक बँकांमध्ये बचत खाती असतील आणि त्यापैकी काही खाती तुम्ही नियमितपणे वापरत नसाल तर ती तातडीने बंद करण्याची गरज आहे. कारण तुम्ही असं केलं नाही तर त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. अनेक आर्थिक सल्लागार हे वापरात नसणारी बचत खाती बंद करणं खातेदारांना फायद्याचं ठरतं असतं सांगतात. गरजेपेक्षा अधिक बचत खाती सुरु करुन ती न वापरणं हे तोट्याचं ठरु शकतं. अनेकदा नोकरी बदलल्यानंतर किंवा एका शहरामधून दुसऱ्या शहरातमध्ये स्थायिक झाल्यानंतर किंवा इतर काही कारणांसाठी एकाहून अधिक बँकांमध्ये बचत खाती सुरु करतो. मात्र अशापद्धतीने अनेक बँकांमध्ये बचत खाती सुरु करणं हे कशाप्रकारे नुकसान करु शकतं हे आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

नक्की पाहा >> गृहकर्जावर मोठी सूट; जाणून घ्या सर्वात स्वस्त Home Loan देणाऱ्या Top 10 बँका व त्यांचे व्याजदर

किमान रक्कम असणे बंधनकारक

अनेक बँकांमध्ये बचत खाती उघडून त्यांचा नियमितपणे वापर न केल्यास सर्वात मोठं आव्हानात्मक काम असतं ते म्हणजे सर्व खात्यांवर मिनिमम बॅलेन्स म्हणजेच किमान जमा रक्कम ठेवण्याचं. ग्राहकांना प्रत्येक बचत खात्यामध्ये महिन्याच्या शेवटी सरासरी किमान रक्कम ठेवावी लागते. किमान सरासरी रक्कम बचत खात्यात ठेवली नाही तर बँक खात्यामधून दंड म्हणून पैसे कपात करते. सर्वच बँकांमध्ये बचत खात्यांना हा नियम लागू होतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बँकेचे ग्राहक म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय उरतात. एक तर तुमच्या बचत खात्यावर नियमितपणे पैसे जमा करणे किंवा दंड भरणे.

डेबिट कार्ड फी

तुम्ही एखाद्या बँकेमधील खातं वापरत नसाल मात्र त्या बँकेचे डेबिट कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला डेबिट कार्ड फी भरावी लागते. बँकेतील फारसे वापरता नसणाऱ्या बचत खात्यातील रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही फी अधिक असू शकते. कोणत्याही बँकेत खातं सुरु करण्यासाठी पैसे आखरले जात नाही. मात्र अनेक बँका आपल्या ग्राहकांकडून डेबिट कार्ड फीच्या माध्यमातून पैसे आकारतात. ही फी वर्षाला १०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असते. डेबिट कार्ड फीसोबतच काही बँका एसएमएस पाठवण्याचीही फी आकारतात. हे फी दर महिन्याला किमान १० रुपये इतकी असू शकते.

बँकेची शाखा कुठे आहे त्यावर ठरते किमान रक्कम

बचत खात्यांमध्ये नियमांनुसार किमान रक्कम ठेवली नाही तर अनेक बँका ग्राहकांच्या खात्यांमधून दंड म्हणून पैसे कापून घेतात. हा दंड आकराला जाऊ नये अशी इच्छा असणाऱ्या खातेदारांनी बँकांमध्ये किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. बँकेची शाखा कुठे आहे, म्हणजेच गाव, जिल्ह्याचे ठिकाण, शहर, मेट्रो शहरे या ठिकाणांनुसार बँकांचे नियम वेगळे असतात. गावामधील बँकेच्या शाखेत किमान रक्कम ही शहरातील किंवा मेट्रो शहरातील शाखांपेक्षा कमी असते. ही रक्कम वेळेत भरली नाही तर ती जमा होते राहते आणि बँकेत कधी खातं बंद करण्यासाठी गेल्यास त्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसते.

आयकर परतावा भरताना अडचणी

तुमच्याकडे एकाहून अधिक बँकांची बचत खाती असतील तर तुम्हाला आयकर परतावा भरतानाही अडचणींचा समाना करावा लागू शकतो. करदात्यांना आयकर परतावा देताना आपल्या प्रत्येक बँक खात्याचा तपशील द्यायचा असतो. मल्टीपल सेव्हिंग अकाऊंट म्हणजेच एकाहून अधिक बचत खाती असतील तर कागदपत्रं गोळा करुन ती जमा करताना जास्त कष्ट घ्यावे लागतात. चुकूनही एखाद्या बँक खात्याची माहिती दिली नाही तर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येऊ शकते.

एका वर्षाहून अधिक काळ बँक खातं वापरलं नाही तर…

जर सलग १२ महिने म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीसाठी एखाद्या बँकेतील बचत खात्यावरुन तुम्ही कोणत्याही पद्धतीचा व्यवहार केला नाही तर ते खातं इनअ‍ॅक्टीव्हेट अकाऊंट म्हणजेच निष्क्रीय खातं असल्याचं मानलं जातं. जर एखाद्या इनअ‍ॅक्टीव्हेट अकाऊंटवरुन पुढील १२ महिन्यांमध्ये कोणताही व्यवहार झाला नाही तर बँक ते खातं डॉर्मेंट अकाऊंट म्हणून गृहित धरतं. इनअ‍ॅक्टीव्हेट अकाऊंटवरुन व्यवहार करण्यास बँका निर्बंध घालत नाहीत. मात्र डॉर्मेंट खातं असेल तर ग्राहकांना नेट बँकिंग, एटीएम किंवा फोन बँकिंगचा वापर करता येत नाही. इतकच नाही तर बँका डेबिट कार्ड, चेक बुक आणि पत्ता बदलण्यासारख्या सोयीही देत नाही.