News Flash

समजून घ्या सहजपणे : मुंबईत जमावबंदी लागू झाली म्हणजे नेमकं काय?

मुंबईत हे कलम लागू करण्याचं नेमकं कारण काय?

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. करोनाचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असतील. कोणीही पॅनिक होऊ नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, जमावबंदी म्हणजे नेमकं काय, हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

जमावबंदी म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल कायदा काय सांगतो हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. अनेकदा बातम्यामध्ये आपण कलम १४४ बद्दल वाचतो. याच कलम १४४ बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कलम १४४ आहे तरी काय? कोण लागू करू शकते हे कलम?

> कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम आहे. हे कलम अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली जाण्याची वा दंगलीची संभावना असेल, मानवी जीवाला आणि आरोग्याला धोका असेल. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

> जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

> यात वर नमूद अधिकारी फौजदारी दंडसंहिता १९७३ मधील कलम १३४ अन्वये नोटीस पाठवून एखाद्या ठरविक व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंध घालण्याचे निर्देश देऊ शकतात. मात्र यासाठी काही अटी आणि नियम आहेत. अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तींवर किंवा लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.

> कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदीचा आदेश लागू करता येत नाही. एखाद्या ठिकाणी दोन महिने जमावबंदी लागू केल्यानंतर ती संपुष्टात आल्यावर पुन्हा नव्याने जमावबंदीचा आदेश काढता येतो. पण जर राज्य सरकारला वाटले नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल असे वाटले तर ही जमावबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

मुंबईत जमावबंदी लागू करण्याचं कारण काय?
मुंबई हे गर्दीचे शहर आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. करोना व्हायरसमुळे आता संसर्गाची भीती वाढली आहे. शिवाय राज्यातील करोना व्हायरसच्या संशयितांची संख्या वाढत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी ग्रुप टूर्स काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे विदेशात किंवा देशांतर्गत टूर्स आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मुंबई दर्शन टूर्सही ३१ मार्चपर्यंत थांबवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 1:32 pm

Web Title: what is section 144 of code of criminal procedure mumbai police pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे: स्पॅनिश फ्लूशी करोनाची तुलना का केली जाते आहे?
2 समजून घ्या सहज सोपे: जवळचा मित्र इराण भारतावर का उलटला ?
3 Coronavirus: समजून घ्या सहजपणे : भारताने केले स्वत:ला ‘विलग-बंदिस्त’
Just Now!
X