Why Aamir Khan took Sitaare Zameen Par to YouTube:सितारे जमीनपर हा चित्रपट १ ऑगस्टपासून यूट्यूबवर १०० रुपये शुल्क भरून पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शिवाय १५ ते १७ ऑगस्टदरम्यान हे शुल्क स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अर्धेच आकरण्यात आले. चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी खास ओळखले जाणारे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असताना अमीर खानने युट्यूबचा पर्याय का निवडावा, या मागचा व्यावसायिक हेतू काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
२१६ कोटींचं कलेक्शन

प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अमीर खानचा सितारे जमीन पर हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘ड्रॅमेडी’ या प्रकारातला होता. या चित्रपटाचं जागतिक बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन २१६ कोटी रुपये इतकं आहे. या चित्रपटाचा सिनेमागृहातील प्रदर्शनाचा कालावधी संपुष्टात आला असून अमीर खानने हा सिनेमा नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर न देता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे.

‘डायरेक्ट-टू-ओटीटी’चा उदय आणि अस्त

२०२० हे वर्ष अनेक स्थित्यंतरांना सामोरे गेले. करोनाच्या विकोपामुळे सारं जगच ढवळून निघालं होतं. त्यापासून सिनेमासृष्टीही कशी अलिप्त राहिली असती? या काळात चित्रपटगृहं बंद होती. नवीन सिनेमा बाजारात कसा आणावा हा यक्षप्रश्नच होता. त्यावेळी दिग्दर्शक शूजित सरकार यांनी आपला ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट प्राईमवर प्रदर्शित केला. मुख्य प्रवाहातील चित्रपट थेट ओटीटीवर येण्याची ती पहिलीच वेळ होती, त्यानंतर यात वाढच होत गेली. आधी थिएटरमध्ये आणि नंतर ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढते आहे. २०२२ साली एकूण २१७ चित्रपट प्रदर्शित झाले. हीच संख्या २०२४ साली ४४० होती, म्हणजे दुप्पट होती. FICCI-EY च्या अहवालामध्ये (२०२४ आणि २०२५) चित्रपट निर्माते सामोरे जात असलेल्या दोन समस्यांचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला आहे.

? एकूणच कोरोनाच्या महासाथीनंतर चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या वाढायला हवी होती, तेवढी वाढलेली नाही. उलट त्यात घटच झाली आहे. २०२२ साली हा आकडा ९९४ दशलक्ष होता, जो २०२४ साली ८५७ दशलक्ष झाला आहे, असे २०२५ च्या FICCI-EY अहवालामध्ये म्हटले आहे. ही घसरण थिएटर-टू-ओटीटी विंडो कमी झाल्यामुळे झाली आहे, असं मानलं जातं. कारण, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट उपलब्ध होत असल्याने थिएटरमधील प्रेक्षकसंख्या कमी होते. ओटीटी प्लॅटफॉर्मना थिएटर- मार्केटिंगच्या गाजावाजाचा फायदा होतो.

? २०२४ साली ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यम बजेटचे चित्रपट मर्यादित स्वरूपात प्रदर्शित झाले. नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘टेंटपोल’ चित्रपट म्हणजे मोठ्या बजेटच्या, चांगले चालतील अशी अपेक्षा असलेल्या आणि अतिशय लहान बजेटच्या चित्रपटांची मागणी होती ; पण मध्यम बजेटच्या चित्रपटांसाठी फारसं कुणी तयार नव्हतं. काही प्रकरणांत “ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाची विक्री वाढवण्यासाठी थिएटरमधील प्रदर्शन गरजेचे असतं,” असं FICCI-EY च्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे.

‘पे-पर-व्ह्यू’ मॉडेल

आमिरने यूट्यूबची निवड केल्यामुळे प्रत्यक्षात चित्रपटांसाठी आणखी एक वितरणाचा मार्ग खुला झाला आहे. “आपल्याला थिएटर आणि ओटीटीच्या दरम्यान ‘पे-पर-व्ह्यू’ (PPV) विंडोची गरज आहे आणि मी तीच निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असं त्याने द टाउन या पॉडकास्टमध्ये मॅथ्यू बेलोनी यांना सांगितलं. पीपीव्ही (Pay-Per-View) मॉडेलमध्ये प्रेक्षकांना नेमकं जे पाहायचं आहे, त्यासाठीच फक्त पैसे द्यावे लागतात. हे सब्सक्रिप्शन नाही.

“थिएटर रन संपल्यानंतर मला पे-पर-व्ह्यूवर यायचं आहे आणि थिएटर रनसाठीची ही विंडो लवचिक असू शकते. पण ती सहा आठवड्यांपेक्षा कमी नसावी. त्यानंतर किमान तीन महिने पे-पर-व्ह्यूला द्यायला हवेत आणि मग चित्रपट ओटीटीवर यायला हवा. हीच आदर्श विंडो आहे,” असं आमिर म्हणाला.

आमिरच्या मते, भारतातील अनेक भागातील लोक ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सब्सक्राईब करत नाहीत आणि यूट्यूब अधिक व्यापक आणि जागतिक पातळीवरील पोहोचत आहे. त्याने हेही सुचवलं की, यूट्यूब पारंपरिक ५०-५० (निर्मिती संस्था आणि थिएटरमधील वाटा) विभागणीपेक्षा अधिक फायदेशीर करार देऊ शकतं. तसेच पीपीव्ही मॉडेल तरुण चित्रपट निर्माते आणि थिएटरमध्ये वितरण न मिळालेल्या लहान बजेटच्या चित्रपटांसाठीही नवा मार्ग खुला करू शकतं.

यूट्यूबचं आश्वासन

FICCI-EY अहवालानुसार, २०२४ साली केवळ ३०% चित्रपट ओटीटीवर (डिजिटल-फर्स्ट आणि थिएटर-फर्स्ट दोन्ही मिळून) प्रदर्शित झाले. त्यात असे काही चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षक मिळाले नाहीत. पण, त्यांना यूट्यूबसारख्या AVOD (advertising-based video-on-demand) आणि TVOD (transactional video-on-demand) प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक मिळू शकतात.

AVOD प्रेक्षकांना जाहिरातींसह मोफत व्हिडीओ पाहण्याची सुविधा देते. तर, TVOD, म्हणजेच PPV, प्रेक्षकांना विशिष्ट कंटेंटसाठी एकदाच शुल्क भरून पाहण्याची सुविधा देते.

FICCI-EY अहवालामध्ये हेही नमूद केलं आहे की, TVOD रिलीज (थिएटरबरोबर किंवा लगेचच नंतर) ज्या भागात चित्रपटगृहांची संख्या मर्यादित आहे अशा भागांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं. शिवाय, १०० रुपयांचं शुल्क हे २०२४ मधील सरासरी १३९ रुपयांच्या चित्रपट तिकिटाच्या किमतीपेक्षा कमी आहे.

चित्रपट निर्मात्यांसाठी यूट्यूब हा पसंतीचा प्लॅटफॉर्म ठरण्यामागे अनेक घटक आहेत.

? २०२४ साली ऑनलाइन व्हिडीओतील तब्बल ९२% हिस्सा यूट्यूबकडे होता.

? मीडिया अॅनालिटिक्स कंपनी कॉमस्कोरच्या २०२४ च्या रिपोर्टनुसार, भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी यूट्यूबचं हे माध्यम सर्वाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.

? यूट्यूब पिढ्यानपिढ्या लोकप्रिय आहे. जनरेशन Z मधील ९१% आणि मिलेनियल्स व जनरेशन X मधील ८०% पेक्षा जास्त मंडळी यूट्यूबवर सक्रिय आहेत.

? यूट्यूबचा बहुतांश वापर मोबाईल फोनवर असला तरी त्याचा CTV (Connected TV) वापरही झपाट्याने वाढतो आहे. २०२३ मार्च ते २०२४ मार्च दरम्यान, भारतातील CTV वर सर्वाधिक पाहिलं गेलेलं स्ट्रीमिंग सर्व्हिस म्हणजे यूट्यूब होतं.

यूट्यूबच्या TVOD सेवांबाबत जास्त सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही.

२०२४ साली भारतातील TVOD उत्पन्न १३ अब्ज रुपयांहून अधिक होतं, पण ते Netflix किंवा JioHotstarसारख्या SVOD (subscription video on demand) सेवांच्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी होतं. SVOD मध्ये प्रेक्षक वार्षिक किंवा मासिक शुल्क भरून मोठ्या प्रमाणावर कंटेंट पाहू शकतात.

अकाउंटिंग फर्म PwC च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २०२३ साली भारतातील ओटीटी उत्पन्नात SVOD चा वाटा ७५% होता, तर TVOD चा ५% आणि AVOD चा २०% होता.

मात्र, FICCI-EY अहवालानुसार, वाढत्या ओटीटी सब्सक्रिप्शनचा खर्च आणि CTV च्या वाढत्या वापरामुळे TVOD अधिक विस्तार होण्याची शक्यता आहे. छोटे ओटीटी प्लॅटफॉर्म्स विक्री न झालेल्या चित्रपटांसाठी TVOD मॉडेल स्वीकारू शकतात आणि मोठे प्लेअर्सही प्राईम आणि अॅपल टीव्हीच्या पावलावर पाऊल ठेवत SVOD आणि TVOD यांचे मिश्र मॉडेल स्वीकारण्याची शक्यता आहे.