scorecardresearch

Premium

अण्णा द्रमुकचे दबावतंत्र की भाजपशी खरेच काडीमोड?

अण्णा द्रमुकचे नेते डी. जयकुमार यांनी भाजपशी तूर्तास युती नसल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ भविष्यात मैत्री होऊ शकते असाही निघतो.

D Jayakumar announced no alliance with BJP
द्रमुकच्या विरोधात प्रबळ आघाडी करण्याच्या दृष्टीने भाजपची चाचपणी सुरू आहे. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

हृषिकेश देशपांडे

अण्णा द्रमुकचे नेते डी. जयकुमार यांनी भाजपशी तूर्तास युती नसल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ भविष्यात मैत्री होऊ शकते असाही निघतो. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने तमिळनाडूतील ३९ व पुदुच्चेरीची १ अशा ४० जागा महत्त्वाच्या आहेत. द्रमुकच्या विरोधात प्रबळ आघाडी करण्याच्या दृष्टीने भाजपची चाचपणी सुरू आहे. राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी अण्णा द्रमुकलाही भाजपची गरज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला तमिळनाडूत एकच जागा जिंकता आली. उर्वरित ३८ जागा द्रमुकच्या नेतृत्वाखाली आघाडीने जिंकल्या. यात प्रामुख्याने काँग्रेस तसेच दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा समावेश आहे. भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी अण्णामलाई यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी तमिळनाडू भाजपची सूत्रे आल्यानंतर राज्यातील राजकारण झपाट्याने बदलले. द्रमुकला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपचे नाव निदान चर्चेत ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. राज्यात गेली पाच दशके भाजप किंवा काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष नाममात्र आहेत. द्रमुक-अण्णा द्रमुकभोवतीच राजकारण फिरते आहे. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक अस्मिता येथे महत्त्वाची ठरते. मात्र अण्णा द्रमुकमधील अंतर्गत यादवीने राजकीय चित्र काहीसे बदलत आहे.

Haryana-BJP-leader-Birendra-Singh
इंडिया आघाडी एकजुटीने लढली, तर भाजपाला मिळेल कडवी झुंज; भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण
Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…
JP nadda rahul gandhi Uddhav thackrey
सनातनबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी -नड्डा; सुनियोजित रणनीती असल्याचा आरोप
Anurag Thakur question
सनातन धर्मावर टीका : उद्धव, राहुल गप्प का? अनुराग ठाकूर यांचा सवाल

अण्णामलाई यांचे आक्रमक राजकारण

अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे २०१६ मध्ये निधन झाले. अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून संघर्ष पेटला. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप करून अण्णा द्रमुकचे सरकार चालवले. मात्र पुढे ई. के. पलानीस्वामी तसेच ओ. पन्नीरसेल्वम असे दोन गट पक्षात पडले. त्यातून उभी फूट पडली. मोठा गट पलानीस्वामी यांच्या मागे राहिला. पोलीस सेवेचा राजीनामा देऊन अण्णामलाई राजकारणात उतरले. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीने चित्र बदलले. त्यांच्या पदयात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने भाजपचे काही जुने कार्यकर्ते दुखावले. त्यांनी अण्णामलाई यांच्या तक्रारी केल्या. मात्र अण्णामलाई यांनी राज्यातील द्रमुक सरकारविरोधात आघाडी उघडली. सनातनवरून उदयनिधी यांच्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच, अण्णामलाई यांनी अण्णादुराई यांच्या १९५६ च्या एका भाषणाचा संदर्भ देत टीका केली. त्यावरून अण्णा द्रमुकमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. जयकुमार यांनी भाजपशी तूर्तास युती नसल्याचे जाहीर केले. भाजपला १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत जेमतेम दीड टक्के मते मिळाली होती. ती गेल्या लोकसभेला चार टक्क्यांवर गेली. २०१४ मध्ये भाजपला सहा टक्के मते मिळाली होती. थोडक्यात पंचवीस वर्षांत राज्यात भाजपची फारशी प्रगती झाली नाही. कारण हिंदुत्ववादी पक्षांना राज्यात फारसे स्थान नाही. मात्र गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाला काही प्रमाणात यश आले. त्यातच आठवडाभरापूर्वी दिल्लीत पलानीस्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. यावेळी भाजपने राज्यात लोकसभेला १५ जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. गेल्या वेळच्या तुलनेत ती तिप्पट आहे. अर्थात इतक्या जागा मिळणार नाहीत, हे भाजपलाही माहीत आहे. मात्र लोकसभेच्या किमान दहा जागा लढविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. यातून अण्णा द्रमुकला भाजपचे इरादे समजले, राज्यात पक्षविस्तारासाठी पक्षाचे प्रयत्न स्पष्ट झाले.

आणखी वाचा-अल्पमतातील सरकारचा पंतप्रधान मोदींनी केला उल्लेख; कमी खासदार असलेले ‘ते’ तीन पंतप्रधान झाले?

भाजपपुढील पर्याय

सध्या अण्णा द्रमुकव्यतिरिक्त तीन ते चार छोटे पक्ष हे भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत. पलानीस्वामी यांच्या अण्णा द्रमुकमधील गटाला पंधरा ते वीस टक्के मते मिळतील असा भाजपचा अंदाज आहे. याखेरीज भाजपची सहा ते आठ टक्के व इतर छोट्या पक्षांची दोन ते तीन टक्के तसेच पीएमकेची पाच टक्के अशी सर्वसाधारणपणे ३३ ते ३५ टक्के मते होतात. यातून तमिळनाडूत लोकसभेच्या पाच ते सहा जागाच जिंकता येणे शक्य आहे. त्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वात आघाडी झाल्यास २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत लाभ शक्य आहे. यामध्ये अण्णा द्रमुकमधील दुसरा पन्नीरसेल्वम यांचा गट, त्यांची पाच ते सहा टक्के मते आहेत. जयललिता यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय शशिकला यांचे भाचे दिनकरन यांच्या पक्षाला तीन ते चार टक्के मते मिळतात. थेवर समाजाचे बळ या दोघांमागे आहे. तमिळनाडूच्या दक्षिणेत हा समुदाय प्रभावी आहे. पट्टल मक्कल काची (पीएमके) पाच टक्के मते व भाजपची मते अशी वीस ते बावीस टक्के मते एकत्र केल्यास २०२४ मध्ये लोकसभेला या आघाडीला तीन ते पाच जागा जिंकणे शक्य आहे. अर्थात दिनकरन तसेच पीएमके यांनी भाजपबरोबर येण्यास होकार देणे गरजेचे आहे. राज्यात सद्य:स्थितीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळेल अशी अपेक्षा नाही. यामुळेच भाजपसाठी अण्णा द्रमुकमधील पलानीस्वामी यांच्या गटाने आघाडी तोडणे फारसे तोट्याचे नाही. भाजप राज्यात विविध पर्याय अजमावत आहे. अण्णा द्रमुकलाही टिकून राहण्यासाठी भाजपची गरज आहे. युती तोडण्याबाबत जयकुमार यांनी घोषणा करताना, निवडणूक आल्यावर विचार करू असे जाहीर करत पर्याय खुला ठेवला आहे.

आणखी वाचा-महिला आरक्षण विधेयकानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित?

द्रमुकचा भक्कम सामाजिक आधार

सनातन धर्मावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भक्कम सामाजिक पाया आहे. अण्णा द्रमुक भाजपबरोबर आल्याने राज्यात मुस्लीम मते एकगठ्ठा द्रमुकबरोबर आहेत. याखेरीज काही जातींचे पक्ष या आघाडीत आहे. अशा वेळी २०२४ मध्ये लोकसभेला तूर्तास तरी द्रमुकपुढे फारसे आव्हान नाही असे चित्र आहे. अण्णा द्रमुकने भाजपशी मैत्री तोडल्याची घोषणा केल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडल्याचा संदेश देशभरात गेला आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांच्या हाती हा एक मुद्दा आहे. दक्षिणेत विस्तार करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना तमिळनाडूत तरी तितकेसे यश अद्याप मिळत नाही हेच यातून स्पष्ट होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anna dmk leader d jayakumar announced that there is no alliance with the bjp at present print exp mrj

First published on: 21-09-2023 at 08:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×