हृषिकेश देशपांडे

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर काहीशा अनपेक्षितपणे १८ मार्च २०१७ रोजी योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा आली. कट्टर हिंदुत्ववादी तसेच गोरखपूरपीठाचे महंत तसेच १९९८ ते २०१७ या कालावधीत गोरखपूरचे खासदार अशी त्यांची ओळख. एका मोठ्या राज्याची जबाबदारी ते सांभाळू शकतील काय, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र आजघडीला उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या योगींची दुसऱ्या कारकीर्दीतील तीन वर्षे बाकी आहेत. राम मंदिर उभारणीच्या नियोजनातील योगदान तसेच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे सुयोग्य व्यवस्थापन पाहता योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली. काही राजकीय विश्लेषक तर भविष्यात ते नेतृत्व करतील असे भाकीत वर्तवत आहेत.

हिंदू युवा वाहिनीपासूनचा प्रवास…

योगी हे १९९८ पासून २०१४ पर्यंत सलग पाच वेळा गोरखपूरमधून लोकसभेवर विजयी झाले. वयाच्या २६ व्या वर्षी सर्वांत तरुण खासदार अशी त्यांची ओळख होती. पहिल्याच विजयानंतर हिंदू युवा वाहिनीची त्यांनी स्थापना केली. पूर्व उत्तर प्रदेशात त्यांची वैयक्तिक ताकद होती. काही मुद्द्यांवर त्यांचे भाजपशी मतभेद असल्याचे चित्र होते. मात्र संघ तसेच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले होते. डिसेंबर २००६ मध्ये गोरखपूरमध्ये विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केल्यानंतर योगींचे नाव अधिक चर्चेत आले. या संमेलनाला संघ परिवारातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. पुढे २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यावर भाजपच्या प्रचाराची प्रमुख धुरा होती. थोडक्यात राज्य भाजपमध्ये योगींचे महत्त्व वाढले.

हेही वाचा >>>विश्लेषण : राहुल गांधींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या ‘बाटाद्राव थान’चे राजकीय महत्त्व काय?

मुख्यमंत्रीपदाची धुरा

मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने बहुमत मिळवले. मनोज सिन्हा यांच्यापासून केशवप्रसाद मौर्य यांच्यापर्यंत अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात होती. मात्र गोरखपूर खासदार असलेल्या योगींनी बाजी मारली. तेथून राष्ट्रीय नेता म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. २४ कोटी लोकसंख्या तसेच लोकसभेच्या ८० जागा हा राज्याचा आकार पाहता देशात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री किती महत्त्वाचा असतो हे ध्यानात येते. योगींना प्रशासन हाताळणे जमेल काय, असा प्रश्न सुरुवातीला विचारला गेला. पण आजघडीला उत्तर प्रदेशात परकीय तसेच देशांतर्गत गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. अलीकडे नामांकित अशा बोईंग कंपनीने उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे केंद्र सुरू केले. जगातील आठ ठिकाणी अशी केंद्र सुरू केली, त्यात उत्तर प्रदेशची निवड करण्यात आली. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असेलेले राज्य ही या नवी ओळख. राज्य मंत्रिमंडळातील  २० ते २२ प्रमुख खाती ५२ वर्षीय योगींकडे आहेत. त्यामुळेच प्रशासनावर पकडही आहे.

प्रचारात मागणी

विविध राज्यांमध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक होते तेव्हा प्रचारसभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ योगींना मागणी असते. यातून त्यांचे पक्षातील स्थान अधोरेखित होते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. विरोधक भाजपला पराभूत करण्यासाठी २००४चा दाखला देत आहेत. त्यावेळी भाजपची देशभर हवा असताना लोकसभेला केवळ १३८ जागा मिळाल्या होत्या. तर याच वेळी उत्तर प्रदेशात ८० पैकी केवळ दहा जागा भाजपला मिळाल्या होत्या, तर काँग्रेसने ९ जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला ३५ तर बहुजन समाज पक्षाला १९ जागा त्यावेळी मिळाल्या होत्या. आता चित्र निश्चित वेगळे आहे. काँग्रेसला आघाडी करूनही नऊ जागा जिंकता येतील हे शक्य नाही. समाजवादी पक्षालाही ती पुनरावृत्ती कठीण आहे. थोडक्यात २०२४ मध्ये दिल्लीच्या सत्तेचा मार्गही उत्तर प्रदेशातूनच जाणार आहे. गेल्या म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ६२ तर मित्र पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजप किमान ७० जागांचे उद्दिष्ट ठेवून आहे. त्या मिळवण्यात योगींचे कसब दिसेल. जर भाजपला हे लक्ष्य गाठता आले तर योगींचे महत्त्व आणखी वाढेल.

हेही वाचा >>>राम मंदिरामुळे अयोध्या ठरणार मोठी बाजारपेठ, वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरातींसाठी शर्यत; जाणून घ्या काय घडतंय?

कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेत मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. मात्र यात भाजपच्या प्रचाराचा भाग अधिक आहे. प्रत्यक्षात सेनगर किंवा ब्रिजभूषण यांच्यासारखे बाहुबली नेते याच राज्यात केवळ पक्षाच्या पाठबळावर उजळ माथ्याने वावरतात, हा आक्षेप आहे. गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हे तपासाचे प्रमाण समाधानकारक नाही. तरीदेखील पायाभूत सुविधांच्या उभारणीत साक्षात मोदींचा वरदहस्त लाभल्यामुळे भरपूर प्रगती दिसून आली. यामुळे गुंतवणूकही वाढली. अयोध्येतील राम मंदिर उभारणीने एकीकडे हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला जात असताना, पायाभूत सुविधांंचा या निमित्ताने झालेला विकास हा चर्चेचा मुद्दा आहे. रेल्वे, महामार्ग विविध मोठे प्रकल्प यामुळे राज्याचे चित्र बदलत असून, त्याचे मुख्यमंत्री या नात्याने श्रेय योगींना जाते. योगी प्रसिद्धी करतात असा आक्षेप विरोधक घेतात. मात्र स्थानिक निवडणुकांमध्येही समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. राज्यात इंडिया आघाडी अजून जागावाटप निश्चित नाही. समाजवादी पक्ष तसेच जयंत चौधरी यांच्या लोकदलाने जागावाटप जाहीर केले. दुसरीकडे भाजपने कल्याणकारी योजनांमधून तयार झालेली लाभार्थींची मतपेढी तयार करण्याबरोबर छोट्या जातींना संधी देत राज्यात आपली मोठी मतपेढी तयार केलीय. केंद्र सरकारच्या मदतीने विविध मोठे प्रकल्प उत्तर प्रदेशात राबवत योगींनी भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार केल्याचे चित्र आहे. यातून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा किंवा त्याचे नियोजन यात योगींचे महत्त्व निःसंशय वाढलेय. विविध देशव्यापी सर्वेक्षणातदेखील भाजपमध्ये लोकप्रियतेत पंतप्रधान मोदींनंतर योगींचा क्रमांक लागतो. त्या दृष्टीने भावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hrishikesh.deshpande@expressindia.com