येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. याच दिवशी राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाकडून केला जात आहे. दरम्यान, एकीकडे या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू असताना दुसरीकडे सायबर क्राईमचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास मिळवून देतो, राम मंदिरातील प्रसाद मोफत देऊ, असे आश्वासन देत लोकांची फसवणूक केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर लोकांना नेमके कोणकोणत्या पद्धतीने फसवले जाण्याची शक्यता आहे? प्रभू रामाच्या दर्शनाच्या नावाखाली नेमकी कशी फसवणूक होऊ शकते? हे जाणून घेऊ या…
व्हीआयपी प्रवेश स्कॅम
प्रभू रामाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास देण्याचे लोकांना आश्वासन दिले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने लोकांच्या मोबाइलवर APK (Android Application Package) फाईल पाठवली जात आहे. या फाईलवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर एक पॉप-अप विंडो उघडते. राम मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी व्हीआयपी पास हवा असेल तर ‘राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान’ नावाची फाईल इन्स्टॉल करा, असे सांगितले जाते. तसेच ही फाईल जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा, असेही आवाहन केले जात आहे.
राम भक्तांना वेगवेगळी आश्वासने
प्रभू रामाच्या दर्शनासाठी उत्सुक असणाऱ्यांना अशा प्रकारची प्रलोभने देण्यात येत आहेत. मंदिराचे ट्रस्ट, अयोध्या मंदिर व्यवस्थापक, केंद्र तसेच राज्य सरकार, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करणाऱ्यांचा या अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनांशी कसलाही संबंध नाही, असे सांगितले जात आहे.
APK फाईल इन्स्टॉल करायला लावली जातेय
अशा प्रकारे मोबाइलवर फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या फाईल्समध्ये मालवेअर असू शकतात, ज्यामुळे तुमच्या मोबाइलमध्ये असणाऱ्या डेटाला धोका निर्माण होऊ शकतो. अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना अशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आयफोनमध्ये साईडलोडिंग सॉफ्टवेअर्सना परवानगी नसते. मोबाइलमध्ये संशयास्पद APK फाईल इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाइलच्या सर्व डेटाचा अॅक्सेस समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्याची तसेच इतर आर्थिक माहिती समोरच्या व्यक्तीला मिळू शकते. त्यामुळे प्रभू रामाच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास देण्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
QR कोडच्या माध्यमातून निधी देण्याचे खोटे आश्वासन
राम मंदिर उभारण्यासाठी दान देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी मोबाइलवर एक क्यूआर कोड पाठवला जात आहे. त्यासाठी समाजमाध्यमावर एक बनावट पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर राम मंदिराच्या बांधकामासाठी पैसेरुपी दान देण्याचे आवाहन केले जात आहे. समाजमाध्यमावर असलेल्या या बनावट खात्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या, उत्तर प्रदेश’ असे नाव देण्यात आले आहे. काही लोकांना तर कथित इस्कॉनकडून (ISKCON ) राम मंदिर उभारणीसाठी देणगी देण्याचे आवाहन करणारे संदेश आलेले आहेत.
बनावट ओळखपत्र तयार करून लोकांची लूट?
बन्सल यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही आवाहनापासून तसेच संदेशांपासून दूर राहण्याचे सांगितले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या नावाखाली बनावट ओळखपत्र तयार करून लोकांना लुटले जात आहे. याबाबत आम्ही दिल्ली तसेच उत्तर प्रदेशच्या पोलिसांना तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकांना सावध राहण्याचेही त्यांनी आवाहन केले.
राम मंदिरातील प्रसाद मोफत देण्याचे आश्वासन
राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तेथील प्रसाद तुमच्या घरी आणून दिला जाईल, असेदेखील आश्वासन दिले जात आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर अशा प्रकारचे आश्वासन देणाऱ्या कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला देत असलेल्या प्रसादाला राम जन्मभूमी ट्रस्टची मान्यता आहे, असा दावा केला जातोय. मात्र, सत्यता तपासल्यास अशा प्रकारे कोणतीही मान्यता न दिल्याचे समोर येत आहे. आम्ही तुम्हाला २२ जानेवारीपूर्वी किंवा २२ जानेवारीपर्यंत हा प्रसाद देऊ, असे आश्वासन अशा कंपन्यांकडून दिले जात आहे. या कथित प्रसाद वाटपासाठी फ्री राम मंदिर प्रसाद, श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्रसाद अशी संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. या संकेतस्थळांकडून आम्ही मोफत प्रसाद देऊ, फक्त शिपिंग खर्च तेवढा द्या, असे या कंपन्यांकडून सांगितले जात आहे.
संकेतस्थळे कायदेशीर आहेत का?
यातीलच खादी ऑरगॅनिक नावाच्या एका संकेतस्थळावरून राम मंदिरातील प्रसाद घरबसल्या तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, कोणतेही ट्रस्ट किंवा कोणतीही शासकीय संस्था या खादी ऑरगॅनिक नावाच्या संकेतस्थळाशी संबंधित नाही. अशा प्रकारची संकेतस्थळे कायदेशीर आहेत की नाही, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
प्रभू रामाचे दर्शन आणि प्रसादाचे सत्य काय?
येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. ज्या लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे किंवा ज्या शासकीय नोकरांना या भागात नोकरीसाठी तैनात केलेले आहे, त्यांनाच अयोध्येत येण्यास परवानगी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथील प्रशासनाला काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार अयोध्येतील सर्व हॉटेल्सना हॉटेलची अॅडव्हॉन्स बुकिंग रद्द करण्याची विनंती केलेली आहे. ज्या लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे, त्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभू रामाची दिवसातून तीन वेळा आरती
प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना प्रभू रामाची आरती करता येणार आहे. त्यासाठी विशेष पास दिले जातील. हे पासेस प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने मिळवता येतील. आरतीसाठी देण्यात येणाऱ्या पास सेक्शन विभागाचे व्यवस्थापक ध्रुवेश मिश्रा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. प्रभू रामाची दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. ज्या लोकांकडे पास आहेत, तेच या आरतीत सहभागी होऊ शकतात. शासकीय ओळखपत्र दाखवून आरतीसाठी पास मिळवता येतील. सध्यातरी ३० लोकांनाच आरतीसाठी पास देण्याची परवानगी आहे. हा आकडा नंतर वाढू शकतो. पासेसची सेवा मोफत आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
निमंत्रितांना वेगवेगळ्या भेटवस्तू
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला आलेल्या निमंत्रितांना तेथे खास भेटवस्तू देण्यात येतील. यामध्ये रामराज्य तसेच प्रसाद असेल. मंदिराच्या पायाभरणीसाठी काढण्यात आलेल्या मातीला रामराज्य म्हटले जाते.