आकाशातील तारेतारकांच्या मदतीने माणसाने दिशादर्शनात खूप प्रगती केली. आधुनिक काळात तर मोबाइल ॲप, विविध सॉफ्टवेअरच्या साहाय्याने दिशादर्शन सोपे झाले. मात्र ऑस्ट्रेलियात आढळणारा बोगोंग पतंग या कीटकाला नैसर्गिकरीत्या दिशादर्शनाचे ज्ञान प्राप्त होते. १००० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी हा लहान मेंदूचा कीटक आकाशगंगेचा मार्गदर्शन म्हणून वापर करतो. या कीटकाविषयी…
बोगोंग पतंग काय आहे?
बोगोंग ही पतंग या कीटक प्रकारातील एक प्रजाती आहे. आग्नेय ऑस्ट्रेलियात हे कीटक आढळतात. वसंत ऋतूमध्ये आग्नेय ऑस्ट्रेलियात उकाडा जाणवायला सुरुवात होते, त्यावेळी हे कीटक बाहेर पडतात आणि १००० किलोमीटरचा प्रवास करून ऑस्ट्रेलियन आल्प्समधील (डोंगराळ भाग) थंड हवेच्या ठिकाणी जातात. डोंगरांच्या कपारीमध्ये ते विश्रांती घेतात. क्वीन्सलँड, न्यू साऊथ वेल्स, विक्टोरिया या मैदानी प्रदेशांतून त्यांचा प्रवास सुरू होतो. शरद ऋतूमध्ये ते पुन्हा आग्नेय ऑस्ट्रेलियातील मैदानी भागांत परततात. तब्बल १००० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आकाशातील ताऱ्यांचा वापर हे कीटक नाव्हिगेशन म्हणजेच दिशादर्शनासाठी करतात. विशेष म्हणजे हे कीटक आयुष्यात एकदाच प्रवास करतात. पुन्हा आग्नेय ऑस्ट्रेलियातील मैदानी भागांत परतल्यानंतर ते अपत्यांना जन्म देतात आणि मरून जातात. त्यांच्या अपत्यांना दिशादर्शनाचे ज्ञान नैसर्गिकरीत्या मिळते.
बोगोंग पतंग दिशादर्शन कसे करतात?
दिशादर्शनासाठी ताऱ्यांचा वापर करण्याचे कौशल्य मानवाप्रमाणे काही पक्ष्यांमध्ये असते. मात्र कीटकांमध्ये असे कौशल्य पहिल्यांदाच आढळले आहे. बोगोंग पतंगाचे पंख सुमारे पाच सेंटीमीटर असतात. त्यांना पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र जाणवते, जे आकाश ढगाळ असल्यास त्यांना आधार देते. चुंबकीय क्षेत्राच्या ज्ञानामुळे ते दिशादर्शन करतात. रात्रीच्या वेळी १००० किमी प्रवास कसा करतात हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे ४०० बोगोंग पतंगांचा अभ्यास केला. आता हे लहान मेंदूचे किडे इतके गुंतागुंतीचे दिशादर्शन कसे व्यवस्थापित करतात हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
शास्त्रज्ञांनी काय प्रयोग केला?
ऑस्ट्रेलियन संशोधक एरिक वॉरंट यांनी बोगोंग कीटकांनी मार्गदर्शनासाठी ताऱ्यांचा वापर केला आहे का याची चाचणी केली. त्यांनी पर्वतरांगांमध्ये पतंगांच्या ठिकाणाजवळ एक विशेष प्रयोगशाळा स्थापन केली. चुंबकीय क्षेत्र नियंत्रित करता येईल आणि आकाशगंगेचा कृत्रिम नकाशा दाखवता येईल, अशा या प्रयोगशाळेत वॉरंट यांनी इतर संशोधकांसह या पतंगाचा अभ्यास केला. हे पतंग मानवांपेक्षा १५ पट जास्त तेजस्वी अंधुक तारे पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना आकाशगंगेचा मार्गदर्शक म्हणून वापर करण्यास मदत होते. या प्रयोगशाळेत खऱ्याखुऱ्या ताऱ्यांची मांडणी करण्यात आली. प्रयोगशाळेने दक्षिणेकडील रात्रीचे आकाश बाहेर दिसत असल्यासारखे प्रक्षेपित केले. ताऱ्यांच्या मांडणीनुसार आकाश दाखविल्यानंतर हे पतंग योग्य दिशेने उडत होते. मात्र ताऱ्यांचा क्रम चुकवला तर ते दिशाहीन होत होते. आश्चर्य म्हणजे वसंत ऋतूमध्ये हे पंतग दक्षिणेकडे आणि शरद ऋतूमध्ये उत्तरेकडे योग्य स्थलांतर दिशेने उडत होते. या कीटकांनी त्यांचा मार्ग दाखवण्यासाठी ताऱ्यांच्या नमुन्यांचा वापर कसा केला हे या प्रयोगातून दिसून आले.
शास्त्रज्ञ काय म्हणाले?
‘‘ही खऱ्या अर्थाने नाव्हिगेशनची कृती आहे. ते विशिष्ट भौगोलिक दिशा शोधण्यासाठी ताऱ्यांचा होकायंत्र म्हणून वापर करू शकतात आणि अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये हे पहिल्यांदाच आढळले आहे,’’ असे या कीटकांवर संशोधन करणाऱ्या वॉरंट यांनी सांगितले. या कीटकांचा खूप लहान मेंदू, खूप लहान मज्जासंस्था आहे. मात्र तरीही तुलनेने जटिल संकेतांचा वापर करण्यास सक्षम आहेत. केवळ स्थलांतरासाठीचे नव्हे, तर नेमके कुठे जायचे आहे हे ठरवण्यासाठीही ते या ज्ञानाचा वापर करतात, असे वॉरंट म्हणाले.
बोगोंग पतंगांचे अस्तित्व धोक्यात?
ताऱ्यांवरून दिशादर्शनाचे ज्ञान प्राप्त असलेल्या बोगोंग कीटकांचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्जरवेशन ऑफ नेचर’ या संस्थेने या कीटकांना संकटग्रस्त सूचीमध्ये टाकले आहे. बदलते वातावरण आणि जागतिक तापमानवाढ यांमुळे या कीटकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. १९८० पासून ऑस्ट्रेलियातील कीटकांच्या या प्रजातींची संख्या कमी कमी होत आहे. आग्नेय ऑस्ट्रेलियात गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे त्यांची संख्या कमालीची घटली आहे. हवामान बदलासह अधिवासाचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप या कारणांमुळेही बोगोंग पतंगांची संख्या घटत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.